राजस्थानच्या गुजरातमध्ये पावसासाठी लाल इशारा
हिमाचलमध्ये आतापर्यंत 350 हून अधिक मृत्यू : 4.07 लाख कोटींचे नुकसान; उत्तराखंडमध्ये ढगफुटी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये अजूनही दमदार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने रविवारी गुजरात आणि राजस्थानमध्ये पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच गोव्यात ऑरेंज आणि मध्यप्रदेश-बिहारसह 20 राज्यांमध्ये यलो अलर्ट दर्शवला आहे. हिमाचल प्रदेशात या पावसाळ्यात आतापर्यंत पाऊस, पूर आणि भूस्खलनाशी संबंधित घटनांमध्ये 366 लोकांचा मृत्यू झाला आहे. या आपत्तीमध्ये 4 लाख कोटींहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. शिमलामध्ये 116 टक्के आणि कुल्लूमध्ये 113 टक्के पाऊस पडला असून सामान्यपेक्षा बराज जास्त आहे.
पंजाबमधील सर्व 23 जिल्हे अजूनही पुरामुळे प्रभावित आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा इशारा नसला तरी लुधियानाचा सासराली धरण फुटण्याचा धोका आहे. पंतप्रधान मोदी 9 सप्टेंबर रोजी पूरग्रस्त भागाला भेट देणार आहेत. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिह्यातील नौगाव येथे शनिवारी संध्याकाळी ढगफुटी झाली. या दुर्घटनेनंतर चिखलमिश्रित पाणी आणि माती अनेक घरांमध्ये आणि बाजरपेठेत शिरल्यामुळे लोकांचा गोंधळ उडाला. रस्त्यावर पार्क केलेली अनेक वाहनेही वाहून गेली.
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे यमुना नदी शहरापासून 1 किमी अंतरावर पोहोचली आहे. घाटावरील आश्रम 5 फूटांपर्यंत पाण्याने भरले आहेत. वृंदावन परिक्रमा मार्ग पाण्यात बुडाला आहे. गुजरातमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे आणि धारोई धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे साबरमती नदीला पूर आला आहे. अहमदाबाद रिव्हर फ्रंट पाण्याखाली गेला असून प्रशासनाने सखल भागातील रहिवाशांसाठी अलर्ट जारी केला आहे. सरकारकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
दिल्लीत सततच्या पावसामुळे यमुना नदी धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक स्तरावरून वाहत आहे. ड्रोन व्हिज्युअल्समध्ये पाण्याचा जोरदार प्रवाह आणि आजूबाजूच्या परिसराची स्थिती दिसून आली. प्रशासनाने सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे रावी नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. जम्मू-पठाणकोट महामार्गाला पुरापासून वाचवण्यात सैन्य गुंतले आहे. हरियाणामध्ये पावसाचे सत्र सुरू असून बहादुरगडमध्ये मैदानात पार्क केलेली अनेक वाहने बुडाल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये चंबळ आणि यमुना नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने इटावाच्या चाकरनगर भागात पूर आला आहे. यमुना नदीने 120.92 मीटरचा इशारा बिंदू ओलांडला आहे. येथे पाणीपातळी 121.66 मीटरपर्यंत पोहोचली असून ती धोक्याच्या चिन्हापेक्षा फक्त 26 सेंटीमीटर खाली आहे. यमुना नदीच्या पुराचा फटका अनेक लोकांना बसला आहे. सिद्धनाथ मंदिर आणि अनेक प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
गुजरातमधील अनेक जिह्यांमध्ये पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिह्यांमध्ये कच्छ, बनासकांठा, पाटण, मोरबी, वलसाड, दमण, दादरा आणि नगर हवेली यांचा समावेश आहे. दुसरीकडे, सुरेंद्रनगर, राजकोट, जामनगर, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जुनागढ, गीर सोमनाथ, दीव, अमरेली, भावनगर, बोताड, अहमदाबाद, मेहसाणा, गांधीनगर, साबरकांठा, नवसारी, सुरत आणि तापीमध्ये मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 12 एनडीआरएफ आणि 20 एसडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत. वडोदरा येथेही एनडीआरएफची एक टीम राखीव ठेवण्यात आली आहे.
Comments are closed.