रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आरक्षित सीट्समध्ये कपात, नवा नियम लवकरच… महागड्या सीटस् प्रवाशांसाठी खुल्या होणार
भांडवल, दुरांतो यांसारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये फर्स्ट क्लास एसी आणि सेकंड एसी डब्यात ‘ऑन बोर्ड स्टाफ’ म्हणजे अटेंडंट आणि मेन्टेनन्स कर्मचारी यांच्यासाठी काही जागा आरक्षित ठेवलेल्या असतात. रेल्वे बोर्डाने कर्मचाऱयांच्या या आरक्षित जागा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टाफच्या नावाखाली ‘ब्लॉक’ होणाऱया या महागडय़ा सीट्स आता प्रवाशांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत.
नवीन नियमांनुसार, फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास एसी डब्यात आता स्टाफसाठी एकही सीट आरक्षित केली जाणार नाही. हाऊसकीपिंग आणि मेंटेनन्स स्टाफसाठी या सीट्स राखीव असायच्या. त्यामुळे रेल्वेचे थेट नुकसान व्हायचे. आता या सीट्स पॅसेंजर सिस्टममध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
नव्या नियमानुसार
ऑन बोर्ड स्टाफमध्ये येणारे सर्वजण (अटेंडंट आणि मेन्टेनन्स कर्मचारी) आता थर्ड एसी आणि स्लीपर कोचमध्ये समाविष्ट केले जातील.
राजधानी आणि दुरांतो एक्प्रेसमध्ये ऑन डय़ुटी असलेल्या कर्मचाऱयांना थर्ड एसी डब्यात जास्तीत जास्त दोन सीटस् दिल्या जातील.
स्लीपर ट्रेन- या ट्रेनमधील स्टाफला स्लीपर क्लासमध्ये जागा मिळेल.
सफाई कर्मचारी- हाऊसकीपिंग स्टाफला थर्ड एसी किंवा स्लीपरमध्ये फक्त साईड लेव्हलच्या एकूण चार सीट्स दिल्या जातील. या व्यतिरिक्त कोणतीही सीटस् दिली जाणार नाही.
पेंट्री कार/ व्हेंडिंग स्टाफ- या कर्मचाऱयांना पूर्ण डय़ुटी पेंट्री कारमध्ये करावी लागेल. त्यांच्यासाठी एकही सीट राखीव ठेवण्यात आलेली नाही, तर पेंट्री कार नसलेल्या ट्रेनमध्ये केवळ दोन सीट राखीव ठेवण्यात येतील.
Comments are closed.