गोळ्या आणि औषधांच्या किंमतीत घट

‘एनपीपीए’ने 35 आवश्यक औषधांचे दर केले कमी : फार्मा कंपन्यांना सरकारचा ‘डोस’

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशभरातील रुग्णांना मोठा दिलासा देण्यासाठी नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने (एनपीपीए) 35 आवश्यक औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, हृदयविकाराशी संबंधित, अँटीबायोटिक्स, डायबिटीज आणि मानसोपचारविषयक अशा महत्त्वाच्या गोळ्या-औषधांचा समावेश आहे. ही औषधे अनेक मोठ्या फार्मा कंपन्यांकडून तयार केली जात असल्याने त्यांना दणका मिळाला आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर दीर्घकालीन आजारांशी सामना करणाऱ्या रुग्णांना थेट फायदा होणार आहे. नव्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीनंतर याआधी जारी केलेले सर्व जुने प्राइस ऑर्डर्स रद्द मानले जातील.

रसायन आणि खते (केमिकल्स आणि फर्टिलायझर्स) मंत्रालयाने ‘एनपीपीए’च्या प्राइस रेग्युलेशनच्या आधारावर दरकपातीसंबंधीची अधिसूचना जारी केली आहे.  एनपीपीए ही संस्था रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असून देशातील औषधांच्या किमती ठरवणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे हे तिचे मुख्य कार्य आहे. सर्व रिटेलर्स आणि डीलर्सनी आपल्या स्टोअरवर नवीन प्राइस लिस्ट स्पष्टपणे लावली पाहिजे. जर कोणी ठरवलेल्या किमतींपेक्षा अधिक शुल्क आकारले तर त्यांच्यावर डीअीसीओ-2013 आणि जीवनावश्यक वस्तू कायदा-1955 अंतर्गत दंड आणि व्याजासह अतिरिक्त वसुलीची कारवाई होऊ शकते, असे ‘एनपीपीए’ने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या औषधांचा समावेश

एसिक्लोफेनॅक-पॅरासिटामॉल-ट्रिप्सिन काइमोट्रिप्सिन, अॅमॉक्सिसिलिन आणि पोटॅशियम क्लेवुलानेट, अॅटोरव्हास्टॅटिन कॉम्बिनेशन्स, तसेच नवीन ओरल अँटी-डायबेटिक कॉम्बिनेशन्स जसे की एंपाग्लिफ्लोजिन, सिटाग्लिप्टिन आणि मेटफॉर्मिन या प्रमुख फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन्सच्या किमती कमी करण्यात आल्याचे अधिसूचनेतून स्पष्ट होत आहे. डॉ. रे•ाrज लॅब्सकडून विकली जाणारी एसिक्लोफेनॅक-पॅरासिटामॉल-ट्रिप्सिन काइमोट्रिप्सिन ही टॅबलेट आता 13 रुपयांना उपलब्ध असेल. तर कॅडिला फार्मास्युटिकल्सची तीच टॅबलेट 15.01 रुपयांना मिळणार आहे. या सर्व औषधांवरील किमतीतील कपातीमुळे ग्राहकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

मुलांसह गंभीर रुग्णांसाठीही दिलासा

हृदयविकाराच्या रुग्णांसाठी महत्त्वाची असणारी अॅटोरव्हास्टॅटिन 40 मि.ग्रॅ. आणि क्लोपिडोग्रेल 75 मि.ग्रॅ. ही टॅबलेट आता 25.61 रुपयांना मिळणार आहे. मुलांसाठी सिफिक्साइम-पॅरासिटामॉल ओरल सस्पेंशन देखील या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन-डी ची गरज भागवण्यासाठी कोलेकॅल्सिफेरॉल ड्रॉप्स आणि दुखणे व सूज यासाठी डायक्लोफेनॅक इंजेक्शन (31.77 रुपये प्रति मि.ली.) देखील यामध्ये समाविष्ट आहे. नवीन दर हे जीएसटी शिवाय ठरवले गेले आहेत.

Comments are closed.