तो निर्णय चुकीचाच होता! 22 वर्षांनंतर पंच बकनरांची उशिरा कबुली
क्रिकेटच्या रंगमंचावर काही क्षण असे असतात, जे स्कोअरकार्डवर नाही, तर चाहत्यांच्या मनावर कोरले जातात. ब्रिस्बेनच्या गॅबावर 22 वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरला दिलेला एलबीडब्ल्यू हा तसाच क्षण होता आणि आता त्या निर्णयाचे पंच स्टीव्ह बकनर स्वतः म्हणतायत – ‘हो, ती चूक होती. तो निर्णय चुकीचाच होता.’ खुद्द त्यांचीच कबुली ऐकून क्रिकेटप्रेमींनाही धक्का बसला आहे.
वेस्ट इंडीज क्रिकेट पंचांच्या संघाला दिलेल्या मुलाखतीत बकनर म्हणाले, ‘सचिनला एलबीडब्ल्यू देणं ही चूक होती. आजही लोक मला विचारतात, का दिलंत आऊट? पण आयुष्यात चुका होतात, माणसाला पुढे जावं लागतं.’
2003-04 सालच्या मालिकेत गॅबा कसोटीत जेसन गिलेस्पीच्या चेंडूला सचिनने चेंडू सोडला, तो त्याच्या पॅडवर लागला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार अपील करताच बकनरांनी बोट वर करत सचिनला बाद दिले. पण नंतरच्या रिप्लेमध्ये स्पष्ट दिसलं की, चेंडू स्टम्पवरून जात होता. का@मेंट्री बॉक्समधील टोनी ग्रेग यांनी या निर्णयाला ‘भयानक निर्णय’ ठरवलं होतं.
ही एकच वेळ नव्हती. 2005 मध्ये ईडन गार्डन्सवर पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत अब्दुल रझ्झाकच्या चेंडूवरही सचिनला झेलबाद ठरवले, पण रिप्लेमध्ये बॅट-चेंडूतील अंतर ठळक दिसलं. तेव्हाही बकनरने सचिनला नाहक बाद दिले होते.
सचिनने 2024 मध्ये चाहत्यांशी बोलताना बकनर यांना मिश्कील टोला लगावला होता, मी फलंदाजी करताना त्यांना बॉक्सिंग ग्लोव्हज् द्या, म्हणजे बोट वर जाणार नाही.
1989 ते 2009 दरम्यान 128 कसोटी, सलग पाच विश्वचषक अंतिम सामन्यांचे पंच असा बकनरांचा मोठा लौकिक आहे, पण गॅबावरील त्या एका बोटाने क्रिकेटप्रेमींच्या मनात कायमची जखम केली. उशिरा का होईना, कबुली मिळाली; मात्र चाहत्यांच्या आठवणींना अजूनही रिप्ले लागतोच.
Comments are closed.