रिलायन्स इंडस्ट्रीज महाराष्ट्रात कोट्यावधींची गुंतवणूक करणार, उत्पादन क्षेत्रात उपलब्ध होणार अनेक नोकऱ्या
नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्राला एक मोठी भेट दिली आहे. अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे बिगर कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज महाराष्ट्रात ३.०५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या गुंतवणुकीमुळे राज्यात तीन लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण होऊ शकतात.
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि महाराष्ट्र सरकारने स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचामध्ये या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी या दोघांनीही या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या क्षेत्रात नोकऱ्या वाढतील
रिलायन्स इंडस्ट्रीजसोबतच्या या करारामुळे महाराष्ट्रात नवीन ऊर्जा, रिटेल, उच्च तंत्रज्ञान उत्पादन क्षेत्र आणि आदरातिथ्य क्षेत्रात लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने दिली आहे. अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली ही गुंतवणूक पूर्ण होणार आहे.
यावेळी अनंत अंबानी म्हणाले की, आम्ही या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करत आहोत ही माझ्यासाठी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी खूप सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज नेहमीच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि नवीन भारताच्या त्यांच्या संकल्पनेसाठी वचनबद्ध आहे. भारतातील सर्वात मोठा व्यवसाय समूह म्हणून आमची कंपनी देशभरात विस्तारत आहे आणि आम्ही या महान राष्ट्राच्या उभारणीसाठी आमची वचनबद्धता पुढे नेत राहू.
इतर व्यावसायिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अनंत अंबानींचे कौतुक
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बिगर कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेचे कौतुक केले आहे. तसेच भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात महाराष्ट्राच्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचे कौतुक केले.
Comments are closed.