लालू, राबडी देवी यांना तूर्तास दिलासा

आयआरसीटीसी मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीला नोटीस

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

आयआरसीटीसी मनी लाँड्रिंग प्रकरणात आपल्यावरील आरोप निश्चितीला आव्हान देणाऱ्या आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीस बजावली आहे. तसेच न्यायालयाने 3 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मागण्याची मुभा दिल्याने लालू आणि राबडीदेवी यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. लालू यादव यांनी 10 सप्टेंबर रोजी सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. पुढील सुनावणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.

यापूर्वी, 11 सप्टेंबर रोजी दिल्लीतील एका विशेष न्यायालयाने आयआरसीटीसी हॉटेल घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. न्यायालयाने आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव, राबडीदेवी, त्यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि इतर आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले. ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, 2002 अंतर्गत या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. हा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोने नवी दिल्लीत दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित होता. या तपासाचा भाग म्हणून सीबीआयने तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, राबडीदेवी, तेजस्वी यादव, पी. सी. गुप्ता आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सीबीआयने भारतीय दंड संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल केलेला आहे.

Comments are closed.