महालक्ष्मी मंदिर परिसराला मिळणार नवी झळाळी; आकर्षक रंगरंगोटी, पथदिवे, दुकानांची फेररचना

मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर परिसराला आता झळाळी मिळणार आहे. या प्रकल्पासाठी 37 कोटी 32 लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे.

उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या धर्तीवर महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास होणार आहे. महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे. मंदिरात मोठय़ा संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मात्र दर्शनासाठी येताना दाटीवाटीचे रस्ते, वाहनांची गर्दी, अरुंद रस्ते, त्यातच अनधिकृत पार्ंकग इत्यादींचा सामना करावा लागतो. मात्र आता महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास होणार आहे. यानुसार मंदिराकडे जाणाऱया मार्गाची सुधारणा, मंदिराकडे जाणाऱया मार्गावरील दुकानाची फेररचना, गर्दीचे नियोजन आदी कामे केली जाणार आहेत. ही विकासकामे दीड वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

भाविकांना सुलभरीत्या दर्शन व्हावे या हेतूने मुंबई महापालिकेने राज्य सरकारच्या मदतीने मंदिर परिसरांचा विकास करण्याचा विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी 25 कोटी रुपयांपर्यंत खर्च येईल, असा अंदाज होता. मात्र या कामासाठी नेमलेल्या सल्लागाराने 37 कोटी 32 लाख 10 हजार रुपये खर्च असल्याचा अहवाल तयार केला. हा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्त यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आणि या खर्च प्रस्तावाला मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली. मंदिर परिसरांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने याआधीच त्यांच्या भागीदारीतील निधीही मंजूर केला आहे.

कोणती कामे होणार…

– मंदिर मार्गावरील दुकानांची फेररचना करून सुसूत्रीकरण. मंदिराकडे जाणाऱया मार्गाची सुधारणा.
– भिंतींची कलात्मक रंगरंगोटी.
– हेरिटेज शैलीत पथदिव्यांचे खांब, लाकडी बाकडय़ांची उभारणी व साइन बोर्ड बसविणे.
– मुख्य मार्गावर कमानी बसविणे. गर्दीच्या नियोजनासाठी उपाययोजना.
– सागरी किनारा मार्गाच्या बाजूला असलेल्या उद्यानामधून आकाशमार्गिका किंवा जिना वा सरकता जिन्याची उभारणी.
– परिसरात पार्ंकग तसेच विद्युत वाहनांची व्यवस्था.
– मोकळ्या जागेवर झाडांची लागवड.
– मंदिर परिसरात शेड बसवणे, सोलर पॅनल बसवणे.
– मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, भिंतीवर आवश्यकतेनुसार भित्तीशिल्प, दीपस्तंभ बसविणे.

Comments are closed.