प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय यांचे निधन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताच्या प्रसिद्ध छायाचित्रकारांपैकी एक रघु राय यांचे रविवारी निधन झाले आहे. निधनासमयी ते 83 वर्षांचे होते. रघु राय यांनी स्वत:च्या कॅमेऱ्याच्या नजरेतून भारताचे विविध रंग आणि जीवनाच्या अनेक पैलूंना जगासमोर आणले होते. रघू राय यांना 2 वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता, त्यातून ते बरेही झाले होते. परंतु अलिकडेच त्यांचा हा आजार पुन्हा बळावला होता अशी माहिती त्यांचे पुत्र नितिन राय यांनी दिली आहे.

रघु राय यांच्यामागे परिवारात पत्नी गुरमीत, पुत्र नितिन आणि कन्या अवनि, लगन तसेच पूर्वई आहेत. रघु राय यांनी स्वत:च्या कारकीर्दीत अनेक ऐतिहासिक घटनांना स्वत:च्या कॅमेऱ्यात कैद केले होते. राय यांनी 1984 मध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेलाही स्वत:च्या कॅमेऱ्यात टिपले होते आणि तसेच या आपत्तीच्या प्रभावावरही त्यांनी काम केले होते. रघु यांनी भारताचे लोक, संस्कृती आणि शहरांवर 18 हून अधिक पुस्तके लिहिली होती. अनेक जागतिक व्यासपीठांवर त्यांच्या कामाचे कौतुक झाले होते. 1972 मध्ये बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या कव्हरेजसाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Comments are closed.