माझ्या आजाराचे वृत्त खोटे : मायावती
भाचा आकाश आनंदवर पुन्हा केला आरोप
वृत्तसंस्था, लखनौ
उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ येथे आयोजित रविवारच्या पत्रकार परिषदेत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी स्वत:चा भाचा आकाश आनंद याला थेट लक्ष्य केले. मी आजारी असल्याच्या खोट्या बातम्या पसरवून समाजात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. आकाश आनंद आजही स्वत:च्या सासऱ्याच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे.
मायावती यांच्या निवासस्थानी तैनात खासगी सचिव आलोक कुमार यांना आकाश आनंदने फोन केला होता. आकाश आनंदने यावेळी बहनजी (मायावती) आजारी आहेत का असे विचारले होते. यावर आलोक कुमारने बहनजी पूर्णपणे तंदुरुस्त असून स्वत:चे काम करत असल्याचे स्पष्ट पेले होते. तसेच आकाश आनंदने आलोक कुमाराला आपण फोन केल्याचे मायावती यांना सांगू नका अशी विनंती केली होती.
आकाश आनंदच्या या कॉलमागील हेतू चांगलाही असू शकतो आणि वाईटही असू शकतो. आकाश आजही स्वत:च्या सासऱ्यांच्या म्हणण्यानुसार वागत असल्याचा दावा मायावती यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत मायावती यांनी ब्रिक्स परिषद, भारत-चीन मैत्री आणि पॅलेस्टाइनच्या मुद्द्यावर स्वत:चे म्हणणे देखील मांडले आहे.
पक्षातून हकालपट्टी
मायावती यांनी आकाश आनंदला यापूर्वीच पक्षातून हाकलले आहे. यापूर्वी 3 सप्टेंबर रोजी मायावतींनी आकाश आनंदची राष्ट्रीय समन्वयक पदावरून हकालपट्टी केली होती, तसेच त्याला पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कायम राहण्याची अनुमती दिली होती. तर 9 सप्टेंबर रोजी त्याचे सासरे आणि माजी राज्यसभा खासदार अशोक सिद्धार्थ यांनी राजकारणातून पूर्ण संन्यास घेतल्यास आकाश आनंदला पुन्हा पक्षात जबाबदारी देण्याचे संकेत दिले होते. यानुसार अशोक सिद्धार्थ यांनी 10 सप्टेंबर रोजी मायावती यांची मागणी मान्य करत राजकारणातून पूर्ण संन्यास घेतला होता. तरीही याच्या काही तासांनी मायावतींनी आकाश आनंदला पक्षातून पूर्णपणे मुक्त केल्याची घोषणा केली होती.
मोदी सरकारचे कौतुक
ब्रिक्स परिषदेवरून मायावती यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. ब्रिक्स परिषदेचे संयुक्त घोषणापत्र हुशारी आणि प्रभावी कूटनीतिचा परिणाम आहे. पॅलेस्टाइन तोडगा आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घोषणापत्रातील उल्लेख महत्त्वपूर्ण असल्याचे मायावती यांनी म्हटल आहे.
Comments are closed.