कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कर्जवसुली करणाऱ्या एजंटांच्या कामकाजात बदल करण्यासाठी नव्या नियमांचा मसुदा जारी केला आहे. सर्वसाधारणपणे कर्जवसुली एजंट कर्जदारांसोबत गैरवर्तन करत असल्याचं दिसून येतं. मात्र, आरबीआयच्या नव्या नियमानुसार कर्जवसुली एजंटांवर मर्यादा येणार आहेत. कर्जदारांसोबत बोलताना एजंटांना मर्यादा पाळावी लागणार आहे, याशिवाय कॉल रेकॉर्डिंग करावी लागणार आहे.

RBI कर्जवसुली प्रतिनिधींसाठी नवे नियम लागू करणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कर्जवसुली प्रतिनिधींच्या नियुक्ती आणि कामकाजाचं नियमन करण्यासाठी नव्या नियमांचा मसुदा जारी करण्यात आला आहे. त्यानुसार एजंटांना प्रशिक्षण देणं अनिवार्य करण्यात आलं आहे. याशिवाय कर्जदारांना वसुलीसाठी करण्यात येणार्‍या फोनचं रेकॉर्डिंग करावं लागेल. वसुली एजंटांना कर्जदारासोबत सभ्यतेनं संवाद साधावा लागेल, असंही आरबीआयच्या मसुद्यात म्हटलं आहे.

आरबीआयच्या मसुद्यानुसार बँकेचा कर्मचारी किंवा वसुली एजंट कर्जदारांसोबत बोलताना सभ्यता आणि मर्यादा पाळली पाहिजे.कर्जवसुलीसाठी कर्जदाराच्या घरी गेल्यानंतर देखील एजंटांचं वर्तन संयमित असावं. आरबीआय या गोष्टीवर देखील विचार करत आहे, वसुली एजंटांना भारतीय बँकिंग आणि वित्तीय संस्थेद्वारे संचलित कर्ज वसुली  प्रशिक्षण अनिवार्य केलं जाईल.

आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी मागील आठवड्यात पतधोरण जाहीर करताना कर्ज वसुली दरम्यान एजंटांचं वर्तन नियमित करण्यासाठी पावलं उचलली जाणार असल्याचं सांगितलं.

कर्जवसुली एजंटांच्या खराब वर्तनामुळं कर्जदारांना अडचणींचा सामना करावा लागल्याची प्रकरण समोर आली आहेत. या घटना समोर आल्यानं आसबीआयनं बँका आणि इतर वित्तीय संस्थांना संवेदनशीलता ठेवण्याचा सल्ला दिला होता. आरबीआयच्या मसुद्यानुसार प्रामुख्यानं म्हटलं गेलं की कर्जवसुली दरम्यान अपमानास्पद भाषेचा वापर करु नये.याशिवाय  एखाद्या कुटुंबात दु:खद घटना घडली असेल, लग्न कार्य, सण किंवा इतर संकटकाळात कर्ज वसुलीचे प्रयत्न करु नयेत.

आरबीआयनं बँकांना आणखी एक सूचना केली आहे की कर्जवसुलीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीचे प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपूर्वी पडताळणी केली पाहिजे.  कर्जपरतफेडी संदर्भातील प्रकरण न्यायालयात असेल बँक कर्मचारी आणि वसुली एजंटांनी अधिक सावध राहिलं पाहिजे.

आणखी वाचा

Comments are closed.