राबडी देवीचे निवासस्थान रिकामे
10, सर्क्युलर मार्ग निवासस्थानी 20 वर्षे वास्तव्य
वृत्तसंस्था / पाटणा
बिहारच्या राजकारणात एक मूक पण महत्वाचे परिवर्तन होताना दिसत आहे. या राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी त्यांचे सरकारी निवासस्थान रिक्त करण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ केला आहे. 10, सर्क्युलर मार्ग, या पत्त्यावरील या निवासस्थानात लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाचे वास्तव्य गेली 20 वर्षे होते. आता त्यांना हे निवासस्थान सोडावे लागत असल्याने ही महत्वाची घटना मानली जात आहे.
गुरुवारी रात्रीपासूनच या निवासस्थानाच्या परिसरात हालचाली दिसून येत होत्या. निवासस्थानातील सामान बाहेर आणून पिकअप व्हॅन्समध्ये भरण्यात येत होते. आता राबडीदेवी आणि लालूप्रसाद यादव यांचे नवे निवासस्थान कोणते असेल, यासंबंधी माहिती उपलब्ध होऊ शकली नसली, तरी हे कुटुंब आता हे निवासस्थान सोडणार असल्याचे स्पष्ट झाल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.
नवे निवासस्थान प्रदान
बिहार सरकारच्या इमारत बांधकाम विभागाने राबडीदेवी यांना नवे निवासस्थान प्रदान केले आहे. राबडीदेवी माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांना नियमानुसार सरकारी निवासस्थान दिले जाणे अनिवार्य आहे. त्यानुसार त्यांना 39, हार्डिंग मार्ग, हे निवासस्थान देण्यात आले आहे. नव्या निवासस्थानासंबंधी निर्णय घेण्यात आल्याने त्यांना हे निवासस्थान सोडावेच लागणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता त्यांनी ते सोडण्याची प्रक्रिया हाती घेतली असून येत्या एक-दोन दिवसांमध्ये ते रिकामे होणार आहे. मात्र, त्यांनी नव्या निवासस्थानाचा स्वीकार केला आहे, किंवा नाही, यासंबंधी बिहार सरकार किंवा यादव कुटुंबाने अद्याप माहिती दिलेली नाही.
हे निवासस्थान मिळाले कसे…
लालूप्रसाद यादव आणि नंतर राबडीदेवी यांनी 1990 ते 2005 या कालावधीत सलगपणे बिहारचे मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. 2005 च्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीने विजय मिळविल्यानंतर त्यांना 1, अनेय मार्ग, हे निवासस्थान देण्यात आले. त्यामुळे ते लालू यादव कुटुंबाला सोडावे लागले. मात्र, त्यांना मुख्यमंत्री निवासाच्या नजीकचेच 10, सर्क्युलर मार्ग, हे निवासस्थान देण्यात आले. तेव्हापासून 20 वर्षे हे कुटुंब याच निवासस्थानात वास्तव्यास होते. या 20 वर्षांच्या काळात बिहारच्या राजकारणाने अनेक हेलकावे अनुभवले. नितीश कुमार आणि यादव कुटुंब यांचे पुनर्मिलनही या काळात दोनदा झाले होते. तथापि, यादव कुटुंब याच निवासस्थानी राहिले. आता त्यांना ते सोडावे लागल्याने राबडीदेवी भावूक झाल्याचे दिसून आले.
Comments are closed.