दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याचे सत्र
महिला प्रदेश अध्यक्ष शरबत जहांनी सोडले पद
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्यो सत्र सुरू झाले आहे. काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष शरबत जहां फातिमा यांनी शुक्रवारी स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षनेतृत्वाने तिकीटवाटपात महिलांकडे डोळेझाक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे बिहार निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या नाराज गटांचे नेते पाटण्यातील प्रदेश कार्यालयासमोर निदर्शने करत आहेत.
पक्षनेतृत्वाने तिकीटवाटपात महिलांना केवळ 8 टक्के प्रतिनिधित्व दिले. हा प्रकार दुर्दैवी आहे. मी दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून महिला प्रदेश अध्यक्षपदावर कार्यरत होते, यादरम्यान पक्षाच्या सर्व महिला कार्यकर्त्यांनी बूथवर जात मेहनत केल्याचा दावा शरबत यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीत महिला कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल अशी अपेक्षा होती, परंतु असे घडले नाही. मला देखील उमेदवारीसाठी नकार देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीत सामील काँग्रेसने 60 जागा लढविल्या होत्या, यातील केवळ 6 जागा काँग्रेसला जिंकता आल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश राम, विधिमंडळ गटाचे नेते शकील अहमद यांनाही स्वत:ची जागा वाचविता आलेली नाही. नामुष्कीजनक पराभवानंतर पक्षांतर्गत विरोधाचे सूर तीव्र झाले आहेत. पक्षाच्या नाराज गटाचे नेते प्रदेशाध्यक्ष राजेश राम आणि प्रदेश प्रभारी कृष्णा अल्लावरू यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
Comments are closed.