डॉ. नरेंद्र जाधव समितीच रद्द करा, सरकारच्या भाषा सल्लागार समितीच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या डॉ. नरेंद्र जाधव समितीला सरकारने रद्द करावे, असा एकमताने ठराव राज्य सरकारच्या भाषा सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या ठरावाची प्रत समितीकडून सरकारला लवकरच सादर केली जाणार असल्याची माहिती राज्य भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपुरात बैठक झाली. या बैठकीला समितीचे बहुतांश सदस्य प्रत्यक्ष तर काही सदस्य ऑनलाइन उपस्थित होते.
त्रिभाषा सूत्रासंदर्भात सरकारने नेमलेल्या डॉ. जाधव समितीवर या बैठकीत जोरदार आक्षेप नोंदविण्यात आले. केंद्राच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कुठेही पहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्याचा विषय नसताना राज्यात त्याचा आग्रह का धरला जातोय, त्रिभाषासंदर्भातीत शासन निर्णय रद्द झाल्यानंतर डॉ. जाधव समिती स्थापन करण्याची गरजच नव्हती असेही मत या बैठकीत उपस्थित करण्यात आले. राज्यातील इतर केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषेच्या विषयाची अंमलबजावणी होत नसल्याबाबत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने त्यासाठी केंद्राकडून एकही रुपयाचा निधी मिळाला नसल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.
स्वतंत्र मराठी राजभाषा विभाग हवा!
सरकारने राजभाषा अधिनियम अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मराठी राजभाषा विभाग स्थापन करावा तसेच मराठी भाषा विकास प्राधिकरण ही अर्धन्यायिक यंत्रणा स्थापन करण्यासाठी स्वतंत्र असा कायदा येत्या विधानमंडळाच्या अधिवेशनात करावा आदी मागण्यांवरही चर्चा होऊन त्या मागण्या सरकारकडे सादर केल्या जाणार आहेत, असे भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले. मराठी शाळांबाबत श्वेतपत्रिका शासनाने प्रकाशित करावी. यासाठी आवश्यक पडल्यास जिल्हा मराठी समित्यांकडून अहवाल मागवावे असाही ठराव यावेळी करण्यात आला.
Comments are closed.