विकासासाठी स्वावलंबी होण्याचा संकल्प!
पंतप्रधान मोदी यांचे आवाहन : गुजरातमधील भावनगरात 33 हजार 600 कोटींच्या सागरी उद्योग प्रकल्पांचे उद्घाटन
अनिलकुमार शिंदे/ भावनगर
शांती आणि समृद्धीसाठी आत्मनिर्भरता अत्यंत महत्त्वाची आहे. विकसित भारताचा मार्ग आत्मनिर्भरतेनेच पुढे जातो. विकासासाठी भारत देश इतरांवर अवलंबून राहणार नाही असा संकल्प करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भावनगरमध्ये केले. देशाने लाखो कोटी विदेशी जहाजांवर खर्च केलेले आहे. सागरी समृद्धीसाठी नवीन सागरी कायदे करण्यात आले आहेत. ‘समुद्र से समृद्धी’साठी येणाऱ्या काळात सत्तर हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. आपला देश साठ वर्षे विकासासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिल्याने देशाचे फार मोठे नुकसान झाले असे स्पष्ट करून पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षावरही या सभेत जोरदार टीका केली.
गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील जवाहर मैदानावर भारतीय जहाजोद्योग मंत्रालयाने शनिवारी आयोजित केलेल्या ‘समुद्र से समृद्धी’ या भव्य जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय कामगार, सक्षमीकरण, युवा व्यवहार व क्रीडामंत्री मनसुख मांडविय, केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्रभाई पटेल, बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर, ग्राहक हित, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री श्रीमती निमुबेन बंबहानिया व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रथम गुजरात भाजपा व सरकारच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत व सन्मान करण्यात आला.
या सभेत जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताचा मंत्र दिला. देशाला समृद्ध बनवण्यासाठी प्रथम आत्मनिर्भर बनावे लागेल. आत्मनिर्भरताच आपल्याला विकासाकडे घेऊन जाते. त्यासाठी आपल्याला संकल्प करावा लागेल. आत्मनिर्भरतेच्या आड येणारी सर्व आव्हाने धुडकावून द्यावी लागतील, असे पंतप्रधान म्हणाले.
क्रूझ पर्यटन विकासासाठी संधी
आज देशात ‘समुद्र से समृद्धी’ महोत्सव बनलेला आहे. भारत सागरी उद्योग क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती करीत आहे, असे सांगून पंतप्रधानांनी सागरी उद्योग क्षेत्राशी संबंधित होऊ घातलेल्या विविध प्रकल्पांचा उल्लेख केला. विकासासाठी समुद्री क्षेत्र एक क्षेत्र बनून उपलब्ध आहे. क्रूझ पर्यटन विकासासाठी फार मोठी संधी देशाला उपलब्ध आहे.
भारताला सागरी समृद्धीची परंपरा
विकासासाठी आत्मनिर्भरतेचा मंत्र घेऊनच पुढे जावे लागणार आहे. समृद्धी, व्यापार व्यवहारात भारत पूर्वी आत्मनिर्भरच होता. भारताला सागरी समृद्धी फार मोठी परंपरा आहे. मात्र, आधुनिक काळात आपण मागेच राहिलो. देशावर साठ वर्षे राज्य केलेल्यांच्या कारकिर्दीत हजारो कोटींचे घोटाळे पहावे लागले. युवा वर्गाला रोजगारीला मुकावे लागले.यात देशाचे फार मोठे नुकसान झाले असे सांगून त्यांनी काँग्रेस पक्षावर अप्रत्यक्ष टीका केली. पूर्वीच्या काळात भारत जगभरात सागरी व्यापारामध्ये कसा आघाडीवर होता. त्यातून आर्थिक विकास कसा होत होता व त्यानंतर कसे दिवस आले व देशाचे कसे नुकसान होत गेले याची माहितीही पंतप्रधान मोदी यांनी दिली.
आगामी काळात भारत समृद्ध सागरी शक्ती बनेल
देशाने लाखो कोटी विदेशी जहाजांवर खर्च केलेले आहे. सागरी समृद्धीसाठी नवीन सागरी कायदे करण्यात आले आहेत. ‘समुद्र से समृद्धी’साठी येणाऱ्या काळात सत्तर हजार कोटी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी जाहीर केले. भारताचे समुद्री तट देशाच्या समृद्धीचे प्रवेशद्वार होणार असून सरकारने अकरा वर्षांपूर्वी ठेवलेले लक्ष्य सफल झाले आहे. भाजप सरकारने सागरी उद्योग क्षेत्रात खूप मोठा विकास घडवून आणलेला आहे. सुरक्षा दलांमध्ये भारताने आत्मनिर्भर बनून बांधलेली जहाजे दाखल होत आहेत. जहाजोद्योग विकास साधत आहे. या उद्योगासाठी लागणारा लोखंडसारखा कच्चा माल भारतातच उपलब्ध होत आहे. सागरी उद्योग विकासासाठी आवश्यक सर्व साधनसुविधा उपलब्ध करण्यास सरकार वचनबद्ध आहे. आगामी काळात भारत एक समृद्ध सागरी शक्ती बनेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. देशात जहाजबांधणी उद्योग वाढायला हवेत, जहाज बांधणी ही अशाच उद्योगांची जननी आहे. या उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. त्यातून छोट्या मोठ्या उद्योगांनाही विकासाचे मार्ग खुले होतात असे स्पष्ट करून पंतप्रधानांनी देशात बांधली जाणारी बंदरे, जहाज बांधणी प्रकल्प व इतर प्रकल्पांची माहिती दिली.
सेवा पखवाड्यासंबंधी माहिती
पंतप्रधानांनी यावेळी बोलताना, सध्या चालू असलेल्या सेवा पखवाड्यासंबंधी माहिती दिली. आजपर्यंत एक लाखांहून अधिक लोकांनी या उपक्रमात रक्तदान केल्याबद्दल जनतेचे आभार मानून लोकांच्या सहभागाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे एक भारत श्रेष्ठ भारत अधिक मजबूत होत असल्याचे ते म्हणाले.
‘समुद्र से समृद्धी’ कार्यक्रमांतर्गत विविध प्रकल्पांची पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ‘समुद्र से समृद्धी’ कार्यक्रमांतर्गत 33,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पांमध्ये कोलकाता येथील श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरात नवीन कंटेनर टर्मिनल आणि इतर प्रकल्प, पारादीप बंदरात नवीन कंटेनर बर्थ, कार्गो हाताळणी सुविधा व इतर प्रकल्प, एन्नोर येथील कामराजर बंदरात अग्निशमन सुविधा, आधुनिक रस्ते जोडणी आणि इतर प्रकल्प यांचा समावेश आहे. चेन्नई बंदरावर किनारपट्टी संरक्षणासाठी मजबूत समुद्री भिंत आणि पुनर्बांधणीची कामे, कांडला येथील दीनदयाल पोर्टमध्ये टूना टेक्रा येथून बहुउद्देशीय कार्गो बर्थ, कार निकोबार बेटावरील समुद्री भिंत, कांडला येथील दीनदयाळ बंदर येथे ग्रीन बायो – मिथेनॉल प्लांट, ऑईल जेटी आणि इतर प्रकल्प, पाटणा येथे जहाज दुरूस्तीची सुविधा, वाराणसी येथील जहाज दुरूस्ती सुविधा आणि मालवाहतूक गाव, 70 कि.मी. लांबीचे चार पदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, सर टी. हॉस्पिटलमधील शैक्षणिक ब्लॉक, शिक्षण, रुग्णालय आणि एमसीएच ब्लॉक, जामनगर येथील जीजीजी हॉस्पिटलमध्ये ओपीडी, एमसीएच आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली.
विविध प्रकल्पांचे उद्घाटन
मुंबई बंदरातील इंदिरा डॉक येथे मुंबई आंतरराष्ट्रीय व्रुझ टर्मिनल, छारा बंदरावर एचपीएलएनजी रीगॅसिफिकेशन टर्मिनल आणि गुजरात 10 सीएल रिफायनरी येथे अॅक्रेलिक्स आणि ऑक्सो अल्कोहोल प्रकल्प, 280 मेगावॅट एसी/400 मेगावॅट डीसी सौर प्रकल्प आणि हरित ऊर्जेसाठी 600 मेगावॅटचा ग्रीन शू इनिशिएटिव्ह गुजरातमधील शेतकऱ्यांसाठी पीएम-कुसुम 475 मेगावॅट क्षमतेचा घटक सी-फीडर, बडेली येथे 45 मेगावॅट सरकारी कचराभूमी सौर पीव्ही प्रकल्प, धोर्दो गावाचे 100 टक्के सौरीकरण या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.
Comments are closed.