किरकोळ महागाई दर 2.75 टक्क्यांवर पोहोचला आहे
जानेवारीतील आकडेवारी : नवीन मालिकेअंतर्गत पहिला डेटा जाहीर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
किरकोळ महागाई दर जानेवारीमध्ये मागील महिन्याच्या तुलनेत 2.75 टक्क्यांपर्यंत वाढला. डिसेंबर 2025 मध्ये हा दर 1.33 टक्के होता. जानेवारीमध्ये झालेली वाढ ही गेल्या 8 महिन्यांतील सर्वाधिक आहे. मे 2025 मध्ये महागाई दर 2.82 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. ब्लूमबर्गच्या एका सर्वेक्षणात जानेवारी महिन्यातील महागाई दर सुमारे 2.77 टक्के असेल, असा अंदाज 32 ज्येष्ठ अर्थतज्ञांनी लावला होता. हा अंदाज जवळपास अचूक ठरल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
केंद्र सरकारने नवीन ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) मालिकेअंतर्गत पहिला महागाईचा डेटा जाहीर केला. गुरुवार, 12 फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2026 मध्ये नवीन सीपीआय मालिकेअंतर्गत भारताचा किरकोळ महागाई दर 2.75 टक्का इतका होता. नवीन सीपीआय डेटा गेल्या दशकाहून अधिक काळातील भारतातील किरकोळ महागाई मालिकेतील पहिला मोठा बदल आहे. सरकारने 2012 ते 2024 पर्यंत महागाई मोजण्यासाठी आधार वर्ष बदलले आहे. हा बदल एका दशकाहून अधिक काळानंतर करण्यात आला आहे.
जानेवारी 2026 मध्ये किरकोळ महागाई वाढली असली तरी ती रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्यापेक्षा कमी राहिली आहे. रिझर्व्ह बँकेने या कालावधीसाठी मध्यम मुदतीचे लक्ष्य 4 टक्के ठेवले आहे. आरबीआयने चलनवाढ 2 टक्के ते 6 टक्क्यांदरम्यान राखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नवीन सीपीआय मालिकेअंतर्गत सलग 12 महिने चलनवाढ आरबीआयच्या लक्ष्यात राहिली आहे. डिसेंबर 2025 मध्ये जुन्या 2012-आधारित मालिकेनुसार किरकोळ महागाई दर 1.33 टक्के होता. तर त्यापूर्वीच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर 2025 मध्ये हा दर 0.71 टक्के होता. महागाई सलग तीन महिन्यांपासून वाढताना दिसत आहे.
Comments are closed.