ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई वाढली

महागाईवाद दर 4.82 टक्के, जुलैपेक्षाही अधिक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाईच्या दरात वाढ झाली असून हा दर आता 4.82 टक्क्यांवर पोहचला आहे. तो जुलै महिन्याच्या महागाईदरापेक्षाही अधिक आहे. अन्नधान्ये, अन्नपदार्थ आणि उत्पादित वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाल्याने महागाई दर वाढल्याचे दिसून येत आहे. इंधनाच्या दरातही वाढ दिसून येत आहे.

जुलैमध्ये महागाई वाढ दर 4.45 टक्के होता. ऑगस्टमध्ये खाण्याचे पदार्थ, हॉटेलमधील खाणे, वीज, इंधन, आरोग्य, शिक्षण, प्रवास आदींसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे फळे, भाज्या, दूध, तेल, मसाले आणि इतर नित्योपयोगी वस्तूंच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. सध्या सणासुदीचा काळ आहे. या काळात सर्वसाधारणपणे वस्तूंचे दर वाढत असतात. तथापि, ऑगस्टमध्ये काही भाज्यांच्या दरात घट झालेलीही पहावयास मिळालेली आहे.

सलग तीन महिने…

गेले तीन महिने सातत्याने महागाई दरात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अनुमानापेक्षा अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये किरकोळ महागाई दर चार टक्क्यांपेक्षा जास्त आहे. रिझर्व्ह बँकेचे अनुमान 4 टक्क्यांचे होते. या महागाईला जागतिक स्थिती मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असल्याचे तज्ञांचे मत आहे. मध्यपूर्वेत होत असलेले अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध याला अधिक प्रमाणात कारणीभूत आहे. कच्च्या इंधन तेलाच्या दराने आता 100 हून अधिक डॉलर्स प्रतिबॅरलची मजल मारली असून त्यामुळे देशांतर्गत इंधन दरांवर मोठा ताण पडत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

कांदा, लसूण आणि आले महाग

ज्या भाज्यांचे दर वाढले आहेत, त्यांच्यात कांदा, लसूण आणि आले यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मांस आणि इतर मांसाहारी पदार्थही अधिक महाग झाले आहेत. कांदा आणि लसूण यांचे दर जवळपास 40 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते. जुलैमध्ये या पदार्थांचा महागाई दर सरासरी 22 टक्के होता. आल्याच्या दरात सर्वाधिक वाढ झाली असून ही वाढ 70 टक्क्यांहून अधिक आहे. या तीन वस्तू ऑगस्ट महिन्यात बाजारातील सर्वात महाग 5 नित्योपयोगी वस्तूंपैकी होत्या, अशी माहिती देण्यात आली. पुढच्या महिन्यात दर उतरण्याची शक्यताही व्यक्त झाली.

टोमॅटो, बटाटा यांच्यामुळे दिलासा

टोमॅटो आणि बटाटा यांच्यामुळे मात्र सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ऑगस्टमध्ये टोमॅटोचे दर 31.09 टक्के घट झाल्याचे पहावयास मिळाले. बटाट्याच्या दरातही साधारणत: 12 टक्के घट झाल्याचे दिसून आले. सणासुदीच्या काळात या पदार्थांना अधिक मागणी असूनही दरांमध्ये घट झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांची काहीशी सोय झाल्याचे अनुभवास येत आहे. या वस्तूंचे दरही पुढच्या महिन्यात आणखी उतरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागात दर अधिक

ग्रामीण भागात शहरी भागांपेक्षाही अधिक दराने महागाई वाढत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दरात 5.23 टक्के वाढ झाली आहे. जुलैमध्ये हा महागाई वाढदर 4.84 टक्के होता. शहरी भागांमध्ये किरकोळ महागाई दर जुलैच्या 3.96 टक्क्यांवरुन 4.31 टक्क्यांवर पोहचला आहे. एकंदर पाहता खाद्य महागाई दर जुलैच्या 5.52 टक्क्यांवरुन 5.95 टक्क्यांवर ऑगस्टमध्ये पोहचला आहे. हॉटेले आणि रेस्टॉरंटस्मधील खाद्यसेवाही 8.38 टक्क्यांनी महागल्या आहेत. आरोग्य आणि व्यक्तीगत सेवासंबंधींचा महागाई दर आता 15.17 टक्क्यांवर पोहचला आहे. सुगीच्या हंगामापर्यंत महागाईशी दोन हात करावे लागतील, अशी शक्यता दिसत आहे.

Comments are closed.