रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणाचा खुलासा : कटामागे बिष्णोई टोळीचा हात, तुरुंगातूनच केले संपूर्ण नियोजन

मुंबई, १७ फेब्रुवारी. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या जुहू येथील निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या हल्ल्याचा कट बिष्णोई टोळीचा महाराष्ट्र प्रमुख शुभम लोणकर आणि त्याचा भाऊ प्रवीण लोणकर यांनी रचल्याचा खळबळजनक खुलासा तपासात झाला आहे. विशेष बाब म्हणजे प्रवीण लोणकर हा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सध्या तुरुंगात आहे. असे असतानाही त्याने रोहित शेट्टीवरील हल्ल्यासाठी शस्त्रे आणि आर्थिक मदत केली.

प्रवीण लोणकर याने तुरुंगात असताना या संपूर्ण गुन्ह्याचे जाळे तयार केल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या कटात सहभागी असलेल्या मुख्य शूटरसह १२ आरोपींना पुणे, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. प्रवीण लोणकर सध्या न्यायालयीन कोठडीत असून, याप्रकरणी त्याला लवकरच रीतसर पोलिस कोठडी देण्यात येणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेत वापरलेली मोटारसायकल, पिस्तुल आणि हल्ल्यासाठी लागणारी रक्कम प्रवीण लोणकर यांच्या सूचनेवरूनच उपलब्ध करून देण्यात आली होती. तुरुंगात असताना प्रवीणने हे सर्व कसे मॅनेज केले हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तो कोणाच्या संपर्कात होता आणि संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी कोणती माध्यमे वापरली जात होती.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेची १२ पथके कार्यरत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. प्रवीण लोणकरला ताब्यात घेतल्यानंतर या कटातील उर्वरित दुवे आणि बिष्णोई टोळीचे पुढील मनसुबे उघड होणार आहेत.

Comments are closed.