बावनकुळेंकडून नैसर्गिक न्यायाची पायमल्ली; कर्मचारी संघटनांचा आरोप, वर्षभरात ‘महसूल’च्या 55 कर्मचाऱ्यांचे निलंबन

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात महसूल विभागाच्या कर्मचाऱयांचा विस्फोट झाला आहे. विधिमंडळात कोणत्याही आमदाराने मागणी केलेली नसताना महसूल विभागाच्या दहा कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई केली आहे. वर्षभरात महसूलच्या 55 कर्मचाऱयांचे निलंबन करून नैसर्गिक न्यायाचीसुद्धा पायमल्ली केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाने केला आहे.

विधिमंडळात महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विनाचौकशी होणाऱया निलंबनाच्या घोषणा आणि महसूल विभागाच्या दीर्घकालीन प्रलंबित असलेल्या आर्थिक व सेवाविषयक विविध मागण्यांचा विचार केला जात नसल्याने महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाच्या वतीने 19 डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार होते.

महसूलमध्ये विक्रमी निलंबन

चंद्रशेखर बावनकुळे यांना डिसेंबर 2024 मध्ये महसूल खाते दिल्यानंतर वर्षभरात बावनकुळेंच्या कार्यकाळात महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱयांचे विक्रमी संख्येने निलंबने झाली आहेत. फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. जानेवारी 2025 पासून आतापर्यंत 28 नायब तहसीलदार व तहसीलदार, 4 उपजिल्हाधिकारी, 8 मंडळ अधिकारी, 14 ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी व 1 महसूल सहाय्यक यांना निलंबित करण्यात आले आहे.

Comments are closed.