पडद्याआडून – ‘शिकायला गेलो एक ’हास्याच्या आडून अंतर्मुख करणारा अनुभव
>> पराग खोत
मराठी रंगभूमीवर आपले वेगळे आणि दिमाखदार स्थान निर्माण करणारे प्रशांत दामले आज ‘विक्रमादित्य’ या नावानेच ओळखले जातात. यापूर्वी कुणालाही न जमलेला सर्वाधिक प्रयोगांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. नुकताच त्यांनी नाबाद 13,333 प्रयोगांचा टप्पा साजरा करत पुढील 15,000 प्रयोगांच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्या कारकीर्दीतील अनेक नाटकांनी महोत्सवी यश मिळवले असून, त्याच परंपरेतील त्यांचे सध्याचे नाटक म्हणजे ‘शिकायला गेलो एक.’ या नाटकाला मिळणारा प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद पाहता चार आकडी प्रयोगसंख्या गाठण्याची क्षमता या नाटकात नक्कीच दिसते.
द. मा. मिरासदार यांच्या ‘व्यंकूची शिकवणी’ या खुसखुशीत कथेच्या एक ओळीच्या कल्पनेवर लेखक-दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनी हे नाटक प्रभावीपणे उभे केले आहे. नव्या पिढीतील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या दादरकर यांनी सर्व वयोगटातील प्रेक्षकांची अचूक नस पकडत नाटकाची मांडणी केली आहे. नेहमीच्या साच्यातून बाहेर पडत प्रशांत दामलेंना वेगळा लुक आणि वेगळी बाजू देण्यात ते यशस्वी ठरले आहेत. अर्थात, दामले त्यांच्या नेहमीच्या फॉर्ममध्येच असून त्यांच्या टायमिंगचा आणि अनुभवाचा प्रत्यय वारंवार येतो.
नाटकाची कथा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त महेश साने यांच्याभोवती फिरते. पुरस्कार घेऊन घरी परतलेल्या सानेंच्या स्वागतासाठी कोल्हापूरचे आमदार खराडे आधीच उपस्थित असतात. कोल्हापुरी थाटात सत्कार झाल्यानंतर आमदार आपल्या मुलगा शामसाठी सानेंना शिकवणी घेण्याची विनंती करतात. अनेक वर्षे दहावीत नापास होणारा शाम एकदाचा पास व्हावा, ही त्यांची तगमग असते. सुरुवातीला साने गुरुजी नकार देतात; पैशांचे आमिषही पह्ल ठरते. मात्र, सानेंची मुलगी विद्या त्यांच्या नव्या शाळेच्या स्वप्नासाठी भरमसाट फी घेऊन शिकवणी घेण्याचा पर्याय सुचवते आणि येथूनच नाटकाची हास्यस्पह्टक सफर सुरू होते.
वडिलांच्या आग्रहामुळे शाम गुरुजींच्या घरी येतो, पण अभ्यासापेक्षा रीलस्टार होण्याची स्वप्ने पाहणारा शाम शिकवणीकडे दुर्लक्षच करतो. गुरुजी त्याला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात, मात्र उलट घडते. शाम गुरुजींनाच तंबाखू, दारू, पब, डेटिंग अॅप्स अशा दुनियेत ओढून नेतो. एका टप्प्यावर गुरुजीही हे वेगळे आयुष्य ‘एंजॉय’ करू लागतात. पुढे काय होते, हे नाटक पाहताना उलगडत जाते. लेखक-दिग्दर्शकाने शक्य त्या प्रत्येक ठिकाणी लेखनातच विनोद पेरल्यामुळे कलाकारांना रंगतदार खेळ उभा करता आला आहे.
हृषिकेश शेलार या गुणी नटाचा आवर्जून उल्लेख करावा इतकी चांगली खेळी त्यांनी केलीय. त्यांनी साकारलेला शाम विशेष लक्ष वेधून घेतो. विनोदाच्या पीचवर प्रशांत दामलेंसारख्या अनुभवी कलाकारासमोर ठामपणे उभे राहणे सोपे नाही, मात्र शेलार यांनी त्यांना आत्मविश्वासपूर्ण साथ दिली आहे. त्यांची कोल्हापुरी भाषा, देहबोली आणि निरागसपणा पात्रात रंग भरतो. आमदार खराडेंची भूमिका काहीशी लाऊड वाटते, ती थोडी संयत झाली असती तर परिणाम अधिक प्रभावी झाला असता. विद्या, काका आणि हेलन ही पात्रे तुलनेने कमी विकसित राहिली आहेत.
हे नाटक आजच्या शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी, राजकीय हस्तक्षेप आणि नव्या पिढीवर होत असलेला सोशल मीडियाचा प्रभाव यावर हसत-खेळत भाष्य करते. सोबतच आपण वाहवत चाललोय याची जाणीव झाल्यावर साने गुरुजींनी दिलेली कबुली मन हेलावून टाकणारी आहे. हसवता हसवता अंतर्मुख करणारी ही कलाकृती आहे. नेपथ्य, गीत-संगीत साजेसे झाले असून, प्रशांत दामले यांची हाऊसफुलची हातोटी पुन्हा एकदा सिद्ध होते. दामले–शेलार या नव्या अफलातून जोडीसाठी हे नाटक पाहायलाच हवे–जरूर पहा!
लेखक ः अद्वैत दादरकर
(मूळ कथा: द. मा. मिरासदार)
दिग्दर्शक ः अद्वैत दादरकर
कलाकार ः ऋषिकेश शेलार आणि प्रशांत दामले, अनघा भगरे, समृद्धी मोहरीर, सुशील इनामदार, चिन्मय माहुरकर
नेपथ्य ः प्रदीप मुळ्ये
प्रकाश ः किशोर इंगळे
संगीत ः अशोक पत्की
सहयोगी : अजय कसुरडे
Comments are closed.