आशिया कपसाठी रिंकू सिंगची निवड धोक्यात, निवड समिती घेणार मोठा निर्णय

भारतीय संघाची आशिया कप टी-20 स्पर्धेसाठीची घोषणा मंगळवारी केली जाणार आहे. अजीत अगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीकडून काही कठोर निर्णय होण्याची शक्यता आहे.

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलची संघात निवड होणार का, यावर चर्चा रंगली आहे. तसेच रिंकू सिंगलाही 15 जणांच्या संघात स्थान मिळवणे सोपे नसणार आहे. रिंकू काही वर्षांपूर्वी चर्चेत आला होता, जेव्हा त्याने यश दयालच्या एका षटकात सलग पाच षटकार लगावून केकेआरला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात ‘फिनिशर’ म्हणून पाहिले जाऊ लागले.

मात्र, मागील काही काळात रिंकूच्या कामगिरीत चढ-उतार दिसून आले आहेत. तो टी20 विश्वचषकासाठी मुख्य संघात न निवडता स्टँड-बाय खेळाडू होता, आयपीएल 2024 मध्ये त्याने फक्त 113 चेंडू आणि 2025 मध्ये केवळ 134 चेंडूंचाच सामना केला. यावरून त्याच्या भूमिकेत घट झाल्याचे संकेत मिळतात. विशेष म्हणजे, 2024 मध्ये केकेआरचे मुख्य रणनीतीकार असलेला गौतम गंभीर हा सध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.

केकेआरच्या थिंक-टॅंकमध्ये असताना गंभीरने रिंकूचा फारसा वापर केला नाही, ज्यामुळे त्याच्या योजनांमध्ये रिंकूची भूमिका मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे आगामी टी20 विश्वचषकात (भारत-श्रीलंका, 2026) रिंकू आपोआप पहिली पसंती ठरतील का, याबाबत शंका आहे.

सध्या फक्त आशिया कपकडे पाहिले तरी रिंकूची स्थिती अस्थिर आहे. सर्व खेळाडू फिट आणि उपलब्ध असतील तर अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक-बल्लेबाज), तिलक वर्मा, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या पाच जणांचे स्थान निश्चित आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केलेले गिल आणि यशस्वी जायसवाल परत आले तर निवडकर्त्यांना एक-दोन स्थानांवर तडजोड करावी लागेल. माजी निवडकर्त्यांनी पीटीआयला सांगितले –
“लोक म्हणतात अमुक खेळाडू घ्यायला हवा, पण मग कोणाला बाहेर करायचं हे कुणी सांगत नाही. श्रेयस अय्यरने 180 स्ट्राईक रेटने 600 धावा केल्या आहेत, पण तो टॉप-4 मध्ये खेळतो. त्याला जागा कुठे मिळणार? जर तुम्ही टॉप-5 मध्ये बदल करू शकत नाही, तर शुबमनला घ्यायलाही अवघड होईल. कारण कसोटी कर्णधाराला तुम्ही बाकावर बसवू शकत नाही.”

माजी निवडकर्त्यांच्या मते, रिंकूचं स्थानच धोक्यात येऊ शकतं कारण बॅटिंग लाईनअपमध्ये त्यांची फारशी गरज उरणार नाही. याशिवाय शिवम दुबे (नितीश रेड्डी फिट नसेल तर) आणि जितेश शर्मा (दुसरा यष्टीरक्षक) हे संघात असतील आणि दोघेही फिनिशरची भूमिका प्रभावीपणे निभावू शकतात.

Comments are closed.