Rinku Singh Father passes away: मोठी बातमी: भारताचा क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन
Rinku Singh Father passes away: भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज रिंकू सिंह याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकू सिंह याचे वडील खचंद्र सिंह यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. खचंद्र सिंह यांनी स्टेज-4 चा यकृताचा कर्करोग होता. अलीकडेच त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वडिलांची प्रकृती खालावल्याचे समजल्यानंतर रिंकू सिंह टीम इंडियाची (Team India) साथ सोडून घरी परतला होता. गेल्या दोन दिवसांपासून रिंकू सिंहच्या (Rinku Singh) वडिलांची प्रकृती चिंतानजक होती. त्यांना कृत्रिम श्वसनप्रणालीवर ठेवण्यात आले. अखेर आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रिंकू 24 फेब्रुवारी रोजी चेन्नई सोडत प्रथम दिल्लीला पोहोचला आणि नंतर ग्रेटर नोएडा येथे रुग्णालयात दाखल असलेल्या वडिलांना भेटला होता. हीच त्यांची अखेरची भेट ठरली.
रिंकू सिंहचे वडील खचंद्र सिंह हे घरोघरी सिलेंडर पोहोचवण्याचे काम करायचे. बालपणी गरिबीमुळे रिंकू सिंहला बराच संघर्ष करावा लागला होता. रिंकू सिंह क्रिकेटपटू म्हणून यशस्वी झाल्यानंतर त्याने वडिलांना सिलेंडर डिलिव्हरीचे काम सोडायला लावले होते. अलीकडेच रिंकूने आपल्या वडिलांना महागडी स्पोर्टस बाईक भेट म्हणून दिली होती. या दोघांमध्ये एक उत्तम ऋणानुबंध होता. त्यामुळे वडिलांच्या निधनामुळे रिंकू सिंह याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
खचेंद्र सिंह हे गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर रिनल रिप्लेसमेंट थेरपी सुरु होती. सध्या भारतीय संघ टी-20 विश्वचषक खेळत आहे. रिंकू सिंहदेखील या भारतीय संघाचा भाग आहे. वडिलांची प्रकृती बिघडल्याचे समजल्यानंतर रिंकू सिंह अर्ध्यातच माघारी परतला होता. मंगळवारी चेन्नईत भारतीय संघाच्या सरावावेळी रिंकू सिंह हजर नव्हता. भारताच्या तरुण आणि उज्ज्वल भविष्य असणाऱ्या खेळाडूंमध्ये रिंकू सिंहची गणना होते. 28 वर्षांचा रिंकू सिंह उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे राहणार आहे. बुधवारी भारतीय संघाच्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी रिंकू सिंह याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे रिंकूला घरी परतावे लागल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, वडिलांची प्रकृती सुधारल्यावर रिंकू परत येईल, असा विश्वास त्यांनी दाखवला होता. मात्र, आता रिंकू सिंह याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे रिंकू सिंह भारतीय संघासोबत यापुढे विश्वचषक स्पर्धेत खेळणार की नाही, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.