जॉइनिंग लेटर घ्यायला लवकरच येईन; रिंकू सिंगचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्री योगी आणि युपी सरकारचे मानले आभार!

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंगचा (Rinku Singh) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने लवकरच लखनऊला येऊन आपले ‘जॉइनिंग लेटर’ स्वीकारणार असल्याचे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आशीर्वाद घेणार असल्याचे सांगितले आहे.
24 मार्च रोजी लखनऊमध्ये आयोजित एका विशेष सोहळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेक खेळाडूंना शासकीय नियुक्ती पत्रांचे वाटप केले. या कार्यक्रमात रिंकू सिंगची रिजनल स्पोर्ट्स ऑफिसर (RSO) या पदावर नियुक्ती करण्यात आली. रिंकू सध्या कोलकाता येथे केकेआरच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये व्यस्त असल्यामुळे या सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली आणि सांगितले की रिंकूला त्याचे नियुक्ती पत्र नंतर दिले जाईल.
या नियुक्तीनंतर रिंकू सिंगने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. रिंकू म्हणाला, नमस्कार, मी रिंकू सिंग. मला रिजनल स्पोर्ट्स ऑफिसर म्हणून नियुक्त केल्याबद्दल मी उत्तर प्रदेश सरकार आणि माननीय मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ सर यांचा मनापासून आभार मानतो. तसेच, एशियन गेम्समधील कामगिरीबद्दल मला 3 कोटी रुपयांनी सन्मानित करण्यात आले, त्याबद्दलही मी माननीय मुख्यमंत्र्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.
व्हिडिओच्या शेवटी रिंकूने स्पष्ट केले की, सध्या आयपीएलमुळे तो येऊ शकला नाही, पण लवकरच तो मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेईल. रिंकू सिंग व्यतिरिक्त इतरही अनेक खेळाडूंना उत्तर प्रदेश सरकारने मोठी पदे दिली आहेत.
राजकुमार पाल: डीएसपी (DSP) पदी नियुक्ती.
प्रवीण कुमार, अजित सिंह आणि सुमिरन: पंचायती राज अधिकारी.
प्रीतिपाल: गट विकास अधिकारी (BDO).
रिंकू सिंग सध्या आयपीएल 2026 साठी पूर्णपणे सज्ज आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सने त्याला संघाचा उपकर्णधार म्हणून मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मैदानावर आता रिंकूचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळणार आहे.
Comments are closed.