बापाचं सरण शांत होण्याआधी रिंकू टीम इंडियात होणार दाखल; टीम इंडिया कोलकात्यात पोहोचली
वडिलांच्या निधनानंतर रिंकू सिंग पुन्हा भारतात रुजू : टीम इंडियाचा सुपर-8 फेरीतील अत्यंत महत्त्वाचा सामना रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. मात्र या सामन्याआधी टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकू सिंग (Rinku Singh) याच्याकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. वडिलांच्या निधनामुळे रिंकू दुःखात आहे आणि अशा परिस्थितीत तो मैदानात उतरणार का, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. आता यासंदर्भात बीसीसीआयकडून ताजी माहिती समोर आली आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया (Devajit Saikia) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू सिंग शनिवारी कोलकात्यात भारतीय संघात पुन्हा सहभागी होणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यासाठी तो उपलब्ध राहण्याची शक्यता वाढली आहे.
रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन (Rinku Singh Father passes away)
रिंकूच्या वडिलांची प्रकृती अत्यंत खालावल्याने त्यांना 21 फेब्रुवारी रोजी ग्रेटर नोएडातील यथार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र शुक्रवारी पहाटे त्यांचे निधन झाले. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी रिंकू शुक्रवारी पहाटे 5 वाजता चेन्नईहून रवाना झाला होता.
उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन(यूपीसीए) चे प्रमुख प्रेम मनोहर गुप्ता यांनीही रिंकूच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. अलीकडेच रिंकूच्या कुटुंबात लग्नसमारंभाची आनंदाची घटना घडली होती. अशा वेळी हा मोठा धक्का बसणे अधिक वेदनादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. संपूर्ण यूपीसीए रिंकू आणि त्याच्या कुटुंबासोबत ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.
बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मनहास यांनीही ‘एक्स’ (माजी ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून संवेदना व्यक्त केल्या. “रिंकू सिंगच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. या कठीण प्रसंगी रिंकू आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. भगवान शिव त्यांना धैर्य देवो,” असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले.
दरम्यान, टी-20 विश्वचषकात रिंकूची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. पाच डावांत त्याने केवळ 24 धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात तो अंतिम एकादशेत नव्हता; त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली होती.
टीम इंडियाचे सेमीफायनल समीकरण (India Semi Final Scenario)
आता भारतासाठी वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना ‘करो किंवा मरो’ असा आहे. सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. सुपर-8 फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध 72 धावांनी दणदणीत विजय मिळवत संघाने शानदार पुनरागमन केले. आता साऱ्यांचे लक्ष या निर्णायक लढतीकडे लागले आहे. भारत पुढील फेरी गाठणार का, की स्वप्न अधुरेच राहणार? रविवारी याचे उत्तर मिळणार आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.