रिंकू सिंगच्या वडिलांचे निधन; विराट कोहली आणि युवराज सिंगसह क्रिकेट जगताकडून दुःख व्यक्त

भारतीय क्रिकेट संघ सध्या टी20 विश्वचषक 2026 (icc T20 international world cup 2026) मध्ये खेळत आहे. 26 फेब्रुवारी रोजी सुपर-8 च्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर शानदार विजय मिळवला. मात्र, या विजयानंतर भारतीय संघाचा खेळाडू रिंकू सिंग याच्यासाठी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली.
रिंकू सिंगचे वडील गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते, त्यांचे ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात निधन झाले. ही बातमी मिळताच रिंकू चेन्नईहून थेट आपल्या घरी अलीगडला रवाना झाला आहे.
रिंकूच्या वडिलांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. विराटने लिहिले, रिंकूच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. या कठीण काळात माझ्या प्रार्थना आणि संवेदना तुझ्या व तुझ्या कुटुंबासोबत आहेत. ईश्वर तुम्हाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती. विशेष म्हणजे, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी रिंकू आपल्या वडिलांना भेटण्यासाठी घरी गेला होता आणि सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधीच तो पुन्हा संघात सामील झाला होता.
विराट कोहलीशिवाय इतर अनेक खेळाडूंनीही रिंकूचे सांत्वन केले आहे. युवराज सिंगने लिहिले आहे की, रिंकूच्या वडिलांच्या निधनाचे वृत्त ऐकून मन हेलावले. अशा वेळी शब्द अपुरे पडतात. आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत. याचबरोबर शिखर धवन, उमेश यादव आणि युजवेंद्र चहल यांनीही सोशल मीडियाद्वारे आपले दुःख व्यक्त केले आहे.
Comments are closed.