रिषभ पंतचा जलवा! बॅट हवेत उडूनही षटकारांची बरसात करत रचला नवा इतिहास

भारत वि इंग्लंडची दुसरी कसोटी: सध्या भारत आणि इंग्लंड संघातील दुसरा कसोटी सामना सध्या रोमांचक वळणावर आहे. या सामन्यावर भारतीय संघाचे पारडे जड दिसत असून त्यांच्याकडे मोठी आघाडी आहे. चौथ्या दिवसाची (5 जुलै) सुरुवात केएल राहुल आणि करुण नायरने केली होती, परंतु दोन्ही फलंदाजांनी आपल्या विकेट गमावल्या. यानंतर शुबमन गिल आणि रिषभ पंतचा जलवा पाहायला मिळत आहे. जेव्हा जेव्हा रिषभ फलंदाजीसाठी येतो, तेव्हा चाहत्यांचे भरपूर मनोरंजन होते.

पंतला शॉट मारताना बॅट सोडण्याची नेहमीच सवय आहे. तो अनेकदा ही चूक करतो आणि असेच काहीसे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावातही घडले. पंतने जोश टंगच्या चेंडूवर हवेत शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. चेंडू नाही, पण पंतची बॅट हातातून सुटल्यानंतर हवेत उडून गेली. हे पाहून समालोचक, मैदानातील प्रेक्षक आणि भारतीय संघाचे खेळाडू मोठ्याने हसू लागले. (Rishabh Pant bat flying viral)

रिषभ पंत नेहमीच आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तो कधीही चेंडूला हवाई प्रवास घडवण्याची क्षमता ठेवतो. पंतने चौथ्या दिवशी आपल्या डावाच्या सुरुवातीलाच एक धडाकेबाज षटकार मारला. खरं तर, जोश टंगच्या चेंडूवर पंतने पुढे येऊन थेट समोर एक जबरदस्त षटकार लगावला. दरम्यान षटकारांच्या बाबतीत पंतने इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एकाच देशात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये पंत पहिल्या स्थानावर आला आहे. (Rishabh Pant six hitting record) त्याने इंग्लंडमध्ये एकूण 23 षटकार मारले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बेन स्टोक्स आहे, ज्याने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत 21 षटकार मारले आहेत.

Comments are closed.