Ratnagiri News – तुरळ–मावळंगे रस्त्यावर खडी साचल्याने अपघातांचा धोका; ग्रामस्थांचा इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तुरळ ते मावळंगे दरम्यानच्या रस्त्यावर गेल्या महिनाभरापासून खडी, वाळू व सिमेंट साचत असल्याने वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या डंपर व मिक्सर ट्रककडून वाहतूक करताना माल रस्त्यावर पडत असल्याने लहान वाहनांचे अपघात होण्याची शक्यता वाढली असून, वाहन चालवणेही कठीण झाले आहे.

तुरळ–धामापूर–करजुवे या मार्गावर धामणी परिसरातील मिक्सिंग कंपनीचे डंपर व ट्रक मोठ्या प्रमाणात वाहतूक करत आहेत. मात्र, या वाहनांकडून योग्य खबरदारी न घेतल्याने खडी व बांधकाम साहित्य रस्त्यावर पडत आहे. यामुळे रस्त्यावर घसरडेपणा निर्माण होऊन दुचाकीस्वार आणि छोट्या वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित कंपनीने तात्काळ उपाययोजना करून माल रस्त्यावर पडणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा, या रस्त्यावरून एकही डंपर किंवा मिक्सर ट्रक फिरू देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

तुरळचे माजी सरपंच अरविंद जाधव, पंचायत समिती सदस्या अपर्णा जाधव, सरपंच अनंत पाचकले तसेच रामचंद्र हरेकर, माजी सभापती कृष्णाजी हरेकर, शांताराम अदावडे, चंद्रकांत तुरळकर आणि रमेश डिके यांनी संयुक्तरित्या हा इशारा दिला आहे. दरम्यान, प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित कंपनीवर कारवाई करावी आणि रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Comments are closed.