आपल्या आराध्य दैवताबद्दलचे विकृत वक्तव्य अत्यंत संताजनक, रितेश देशमुख भडकला
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या देशभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख या वक्तव्यावरून बागेश्वर बाबांवर भडकला आहे. रितेशने याबाबत एक ट्विट केले आहे.
”कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे. असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे… प्रौढप्रतापपुरंदर… क्षत्रियकुलावतंस… सिंहासनाधिश्वर… महाराजाधिराज… श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज”, असे रितेशने ट्विट केले आहे.
भोंदूबाबांचे नवनवे कारनामे आणि नेत्यांच्या वादग्रस्त विधानांनी महाराष्ट्र ढवळून निघाला असताना आता ‘नवे इतिहासतज्ञ’ बागेश्वर बाबांनी थेट शिवरायांचा इतिहासच बदलून टाकला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते. त्यामुळे त्यांनी समर्थ रामदासांकडे जाऊन आपण राज्य कारभार सांभाळावा!’ अशी प्रार्थना केल्याचे बागेश्वर बाबा म्हणाले.
विशेष म्हणजे नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच त्यांनी अकलेचे तारे तोडले! या वक्तव्यावरून राज्यभरात शिवप्रेमींमधून संतापाची लाट उसळली आहे.
Comments are closed.