आरएलओए उमेदवाराचा आज निर्णय घेण्याची शक्यता आहे
उपराष्ट्रपती निवडणूक : विरोधी आघाडीकडूनही चाचपणी : 21 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उपराष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी ‘रालोआ’कडून आज, 17 ऑगस्ट रोजी उमेदवार निश्चित केला जाणार आहे. भाजप संसदीय मंडळाची बैठक रविवारी संध्याकाळी 6 वाजता होणार असून त्यामध्ये उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित केले जाऊ शकते. हा उमेदवार 21 ऑगस्ट रोजी नामांकन दाखल करेल. या दरम्यान, एनडीएशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहतील. दुसरीकडे, विरोधी आघाडीचे नेते 18 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारावर चर्चा करण्यासाठी बैठक घेऊ शकतात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ‘इंडिया’ ब्लॉकमधील नेत्यांशी संपर्क साधत असल्याचे समजते.
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट आहे. 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. 21 जुलैच्या रात्री जगदीप धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागत आहे.
सस्पेन्स कायम राहिला
रालोआमधील उमेदवार कोण असेल याबाबत सस्पेन्स कायम आहे. भाजपकडून थावरचंद गेहलोत हे सर्वात प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे. भाजप या पदासाठी आपल्या विचारसरणीला समर्पित कार्यकर्त्याला उभे करू शकते. सध्या पक्षात सुरू असलेल्या नावांमध्ये कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत हे सर्वात प्रबळ दावेदार मानले जातात. दुसरे नाव सिक्कीमचे राज्यपाल ओम माथूर यांचे आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ऐनवेळी धक्कादायक नाव जाहीर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तथापि, आरएसएसचा जुना आणि विश्वासू चेहरा असलेले शेषाद्री रामानुजन चारी यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. दक्षिण भारतातील चारी हे केवळ वैचारिक ताकदीसाठीच नव्हे तर राजकीय संतुलनासाठीही भाजपसाठी एक महत्त्वाचा चेहरा मानले जातात. शेषाद्री चारी यांचा जन्म मुंबईत झाला होता, परंतु त्यांचे कुटुंब तामिळनाडूतील तंजावरशी संबंधित आहे. ते दीर्घकाळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून विचारसरणीचे ते एक कट्टर समर्थक मानले जातात. चारी हे केवळ राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जात नाहीत तर त्यांना परराष्ट्र धोरणाच्या बाबींचीही सखोल जाण आहे.
संसदेत एनडीएकडे बहुमत
लोकसभेतील एकूण 542 सदस्यांपैकी एनडीएकडे 293 आणि विरोधी आघाडीकडे 234 सदस्य आहेत. राज्यसभेतील 240 सदस्यांपैकी एनडीएला सुमारे 130 आणि विरोधी आघाडीला 79 खासदारांचा पाठिंबा आहे. एकूणच, एनडीएला 423 आणि विरोधी आघाडीला 313 खासदारांचा पाठिंबा आहे. उर्वरित सदस्य कोणत्याही गटाशी संबंधित नसले तरी त्यांचे मत सत्ताधारी आघाडीच्या बाजूने पडू शकते. साहजिकच सत्ताधारी गटाने दिलेला उमेदवारच उपराष्ट्रपती म्हणून निवडून येणे क्रमप्राप्त आहे.
Comments are closed.