कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खूशखबर; ‘रो-रो’ सेवेला नांदगावमध्ये थांबा मिळणार

गणेशोत्सवासाठी कोकणातील गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना कोकण रेल्वेने खूशखबर दिली आहे. गणपती सणादरम्यान कोकण रेल्वे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या ‘रो-रो’ सेवेला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नांदगाव स्थानकावर थांबा दिला जाणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे परिसरातून कोकणात आपली कार ‘रो-रो’ ट्रेनमधून नेण्याचे प्लॅनिंग केलेल्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
कोकण रेल्वेने महिनाभरापूर्वी ‘रो-रो’ सेवेची घोषणा केली होती. त्यावेळी ही सेवा कोलाड ते थेट वेरना या स्थानकांदरम्यान चालवली जाणार होती. त्यामुळे या सेवेचा सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही फायदा होणार नव्हता. त्या पार्श्वभूमीवर ‘रो-रो’ सेवेचे स्वागत करण्याऐवजी कोकणी जनतेने जोरदार टिका केली होती. किंबहुना, गणेशोत्सव काळात नियमित रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होऊ नये म्हणून ‘रो-रो’ सेवा रद्द करण्याची मागणी झाली होती.
कोकणी जनता आणि चाकरमान्यांचा तीव्र विरोध लक्षात घेत अखेर कोकण रेल्वे प्रशासनाने ‘रो-रो’ ट्रेनला नांदगाव स्थानकातही अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाकरमान्यांना आता कोलाड स्थानकात आपली कार ‘रो-रो’ ट्रेनमध्ये लोड करता येईल आणि सिंधुदूर्गातील नांदगाव स्थानकात उतरवता येणार आहे. कोलाड ते नांदगावपर्यंतची कार वाहतूक करण्यासाठी चाकरमान्यांना 5460 रुपये द्यावे लागणार आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास टाळून कार गावी पोहोचणार असल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
Comments are closed.