युवराजच्या निवृत्तीला विराट कारणीभूत, उथप्पाचा गौप्यस्फोट
हिंदुस्थानचा सर्वोत्तम अष्टपैलू असलेल्या युवराज सिंगची कारकीर्द माजी कर्णधार विराट कोहलीच्या वागणुकीमुळे संपुष्टात आल्याचा गौप्यस्फोट माजी कसोटीपटू रॉबिन उथप्पाने केला. कोहली आणि त्याच्या व्यवस्थापनाने युवराजला निवृत्ती घेण्यास भाग पाडल्याच्या वक्तव्यानंतर क्रिकेट विश्वात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रॉबिन उथप्पाने युवराज सिंगच्या निवृत्तीबाबत बोलताना हे भाष्य केले. उथप्पा म्हणाला, युवराजचे हिंदुस्थानच्या क्रिकेटमध्ये अत्यंत मोलाचे योगदान आहे. कर्करोगाशी झगडत असताना त्याने हिंदुस्थानला विश्वचषक जिंकून दिला. तसेच युवराजचा हिंदुस्थानला दोन विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा होता. ज्याने कर्करोगावर मात केली आणि तो पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर येण्याचा प्रयत्न करत होता त्याला तुम्ही कर्णधार झाल्यावर फुप्फुसाची क्षमता कमी झाल्याचे म्हणत डावलता. तुम्ही त्याला संघर्ष करताना पाहिले होते. मान्य आहे की एक दर्जा राखायचा होता, पण त्यालाही काही अपवाद असतात. युवराज त्या अपवादाला पात्र होता. कारण त्याने फक्त स्पर्धा जिंकल्या नाहीत, तर त्याने कॅन्सरलाही पराभूत केले आहे.
युवराजने फिटनेस चाचणीच्या स्तरांमध्ये काही सवलती मागितल्या होत्या, परंतु ही विनंती विराटने नाकारली. युवराजने फिटनेस चाचणीत दोन गुणांच्या कपातीची विनंती केली, तेव्हा विराटने त्याला नकार दिला. युवराज फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाला, संघात आला. पण विराट कर्णधार होता, त्यामुळे त्याला बाजूला करण्यात आले, असा दावा उथप्पाने केला आहे.
Comments are closed.