‘धावांची भूक अजूनही कायम’; विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीवर उथप्पाचं मोठं विधान
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतून सात महिने उलटले असले, तरी त्यांच्या निवृत्तीचा मुद्दा आजही सातत्याने चर्चेत आहे. अनेक चाहत्यांच्या मनात अजूनही एकच प्रश्न आहे. ही निवृत्ती दोघांनी स्वतःच्या इच्छेने घेतली होती की त्यामागे काही दबाव होता? आता माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने या चर्चेला पुन्हा एकदा हवा दिली आहे. उथप्पाच्या मते, विराट आणि रोहित यांची कसोटी क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती ही ‘नॅचरल एक्झिट’ म्हणजेच स्वाभाविक एक्झिट वाटत नाही.
मे 2025 मध्ये, आयपीएल 2025 सुरू असतानाच काही दिवसांच्या अंतराने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. सर्वप्रथम रोहित शर्माने सोशल मीडियावरून आपल्या निवृत्तीची माहिती दिली. त्याच काळात बीसीसीआयचे निवड समिती सदस्य इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहितकडून कसोटी कर्णधारपद काढून घेण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे रोहितच्या निवृत्तीमागील कारणांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. चाहत्यांना या धक्क्यातून सावरता येते न येते, तोच विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटला अलविदा केल्याची घोषणा करून सर्वांनाच चकित केले.
विराट कोहलीची निवृत्ती विशेषतः धक्कादायक ठरली होती. कारण तो इंग्लंड दौऱ्याच्या तयारीत होता. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत त्याने शतक झळकावले होते आणि त्याचा आत्मविश्वास उच्चांकी होता. इंग्लंड दौऱ्यावर दोन-तीन शतके झळकावण्याचा त्याचा मानस असल्याचेही समोर आले होते. दिल्ली रणजी संघाचे प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनीही कोहली इंग्लंड दौऱ्यासाठी अत्यंत उत्सुक असल्याचा दावा केला होता.
रॉबिन उथप्पाने आपल्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडीओमध्ये स्पष्ट मत मांडले. “मला माहीत नाही की ही निवृत्ती कुणाच्या दबावामुळे झाली की नाही, पण हे नक्कीच नॅचरल एक्झिट वाटत नाही. यामागचं खरं कारण विराट आणि रोहितच योग्य वेळी सांगू शकतील,” असे तो म्हणाला. उथप्पाने रोहितच्या फॉर्मबाबतही भाष्य केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित धावा करण्यात अपयशी ठरत असताना त्याने सहा महिन्यांचा ब्रेक घेऊन फिटनेसवर काम करायला हवे होते, असे त्याचे मत होते. “रोहित आणि विराट दोघांच्याही डोळ्यांत अजूनही धावांची भूक स्पष्ट दिसते,” असे सांगत उथप्पाने त्यांच्या निवृत्तीबाबतचा संशय अधिक गडद केला आहे.
Comments are closed.