विराट कोहलीने रायुडूला 2019 विश्वचषकातून जाणूनबुजून वगळले, माजी क्रिकेटपटूचा गंभीर आरोप

इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या 2019 एकदिवसीय विश्वचषकात भारत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. मात्र सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव होऊन संघ बाहेर पडला. त्या विश्वचषकात भारताच्या कामगिरीसोबतच संघ निवडीचीही खूप चर्चा झाली होती. याचं सर्वात मोठं कारण होतं अंबाती रायुडू.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रायुडूला टीम इंडियातील निवडीसाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण नंतर त्याच्या जागी अष्टपैलू विजय शंकरची निवड करण्यात आली. या धडाकेबाज फलंदाजानं संघातून वगळल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. आता माजी भारतीय खेळाडू रॉबिन उथप्पानं रायुडूची निवड न करण्यासाठी तत्कालीन कर्णधार विराट कोहलीला जबाबदार धरलं आहे.

2019 च्या विश्वचषकापूर्वी अंबाती रायुडूला सातत्यानं संधी मिळत होती. त्याची कामगिरीही चांगली होती. या स्पर्धेपूर्वी रायुडूनं 55 ​​एकदिवसीय सामन्यांत 47.05 च्या सरासरीनं 1694 धावा केल्या होत्या. मात्र असं असूनही त्याला विश्वचषकाच्या टीममधून वगळण्यात आलं आणि त्याला पुन्हा कधीही भारताकडून कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

‘लल्लनटॉप’शी झालेल्या विशेष संभाषणात रॉबिन उथप्पानं अंबाती रायुडूला 2019 च्या विश्वचषकातून वगळल्याबद्दल चर्चा केली. या माजी खेळाडूनं विराट कोहलीवर आरोप केले. उथप्पा म्हणाला,  “जर विराट कोहलीला कोणी आवडत नसेल, तर तो त्यांना वगळायचा. अंबाती रायुडू याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतात हे मी मान्य करतो. परंतु एखाद्या खेळाडूला इतक्या वर नेल्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी दरवाजे बंद करू शकत नाही. त्याच्या घरी वर्ल्ड कपचे कपडे, वर्ल्ड कप किट बॅग सगळं काही तयार होतं. एखादा खेळाडू असा विचार करत असेल की तो वर्ल्ड कपला जाणार आहे, परंतु तुम्ही त्याच्यासाठी अचानक दरवाजे बंद केले. मला वाटतं ते योग्य नव्हतं.”

हेही वाचा –

तब्बल 8 वर्षांनंतर टीम इंडियात परतणार हा खेळाडू? 6 डावांमध्ये ठोकली आहेत 5 शतकं!
बुमराह कर्णधार बनला तर उपकर्णधार कोण होणार? हे दोन खेळाडू शर्यतीत
“मी कपिल देवला मारायला निघालो होतो”, माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक खुलासा

Comments are closed.