काँग्रेसच्या रोहिणी घुले कर्जतच्या नगराध्यक्ष, आमदार रोहित पवार यांना धक्का

सर्वांचे लक्ष लागलेल्या कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी काँग्रेस पक्षाच्या रोहिणी सचिन घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा 2 मे रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि आमदार रोहित पवार यांच्या कट्टर समर्थक प्रतिभा भैलुमे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी रोहिणी घुले यांचा एकमेव अर्ज राहिला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांनी दिली. या निवडीमुळे आमदार रोहित पवार यांना धक्का बसला आहे.

कर्जत नगरपंचायतच्या सन 2022 साली झालेल्या निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन झाली होती. 17 पैकी 12 नगरसेवक राष्ट्रवादीचे आणि तीन नगरसेवक काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते. भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या.

आमदार रोहित पवार यांनी अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपदी उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले यांना संधी दिली. मात्र, अडीच वर्षांच्या या कालावधीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये धुसफूस सुरू होती. अडीच वर्षांची मुदत संपल्यानंतर उषा राऊत यांना राज्य सरकारच्या नियमामुळे पुन्हा संधी मिळाली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नगरसेवकांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा घेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये फूट पाडत आठ नगरसेवक फोडले.

यातच काँग्रेसचे नाराज तीन नगरसेवकही सोबत आल्यामुळे राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा तेरा नगरसेवकांची मोट बांधली गेली. गटनेते फुटल्यामुळे रोहित पवार यांना कोणतीच संधी मिळाली नाही. एवढेच नव्हे तर राम शिंदे यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी पाहून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायद्यामध्ये बदल केला आणि नवीन कायदा अविश्वास प्रस्तावासाठी लागू केला. रात्री बारा वाजता राज्यपालांनी त्या अध्यादेशावर सही केली.

यानंतर उषा राऊत यांनी अविश्वास प्रस्तावाला सामोरे न जाता राजीनामा दिला. राऊत यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली. दिनांक 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्यात आले. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. मुदत संपण्यापूर्वी श्रीमती भैलुमे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे एकमेव अर्ज राहिलेल्या रोहिणी सचिन घुले या नगराध्यक्ष झाल्या आहेत. याबाबत 2 मे रोजी अधिकृत घोषणा होणार आहे.

Comments are closed.