Rohini Khadse’s counterattack on Chitra Wagh who criticized Supriya Sule over the incident in Paud
(Rohini Khadse on Chitra Wagh) जळगाव : पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील पौड गावात एका समाजकंटकाने नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केली. याप्रकरणी 19 वर्षीय चांद नौशाद शेख आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले. तर आता, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. (Rohini Khadse’s counterattack on Chitra Wagh who criticized Supriya Sule over the incident in Paud)
मुळशी तालुक्यातील पौड गावात शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास, चांद नौशाद शेख याने मंदिर परिसरात मूर्तीशी अभद्र व्यवहार करतानाच तिची विटंबनाही केली. याचे सीसीटीव्ही फूटेजही समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर शिवाजी वाघवले नावाच्या ग्रामस्थाने याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चांद नौशाद शेख आणि त्याचे वडील नौशाद शादाब शेख (44) या दोघांना अटक केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की ज्यांना साधं नागरिक शास्त्र कळत नाही त्यांना आमदारकी देऊ नका ओ !
आता आरोपीला पकडणार कोण ? पोलीस यंत्रणा
आरोपीला शिक्षा देणार कोण ? न्याय व्यवस्था
महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था राखणार कोण ? गृहमंत्री
अशा घटना रोखण्यासाठी धोरण… https://t.co/zWMDkFQvfq— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) May 5, 2025
या घटनेसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट शेअर केली आहे. पौड गावातील अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात एका तरुणाने गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे. ही घटना अतिशय घृणास्पद आणि संतापजनक आहे. कोणतीही संवेदनशील व्यक्ती हे सहन करणे कदापि शक्य नाही. माझी शासनाला विनंती आहे की, कृपया या तरुणावर तातडीने कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा – Chitra Wagh Vs Supriya Sule : तुष्टीकरणाचे राजकारण सुचतंय का? पौडमधील घटनेवरून चित्रा वाघ आक्रमक
तथापि, यात आरोपीच्या नावाचा उल्लेख नसल्याचे सांगत भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावरच त्याला प्रत्युत्तर दिले आहे. एरवी प्रचंड संवेदनशील असल्याचा आव सुप्रिया सुळे आणतात. अगदी रशिया आणि युक्रेन युद्धावरही त्या तावातावाने मते मांडतात; पण आपल्याच मतदारसंघात म्हणजे मुळशी तालुक्यातील पौड गावात जो घृणास्पद आणि संतापजनक प्रकार घडला त्यावर चार ओळींचे ट्वीट टाकून त्या गप्प आहेत? त्या नीच आणि विकृत चाँद शेखचे त्यांनी नावही घेतले नाही? तुष्टीकरणाचे राजकारण सुचते आहे का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
त्याला प्रत्युत्तर म्हणून रोहिणी खडसे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रा वाघ यांचा खरपूस समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की, ज्यांना साधे नागरिकशास्त्र कळत नाही, त्यांना आमदारकी देऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. आता आरोपीला पकडणार कोण? तर, पोलीस यंत्रणा; आरोपीला शिक्षा देणार कोण? न्यायव्यवस्था; महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था राखणार कोण? गृहमंत्री; आणि अशा घटना रोखण्यासाठी धोरण राबवणार कोण? तर सरकार! असे असतानाही चित्रा वाघ मात्र सुप्रिया सुळे यांच्या नावाने खडे फोडत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
फडणवीस यांच्या Good Booksमध्ये चित्रा वाघ यांना रहायचे आहे, याची आम्हाला कल्पना आहे. पण त्यासाठी त्या काही पण करतील का? असा प्रश्न करून, जरा वेळेवर गोळ्या घेत चला, असा खोचक सल्ला त्यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.
Comments are closed.