मफलर मॅन फडणवीस! व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवताहेत, अजित पवार मृत्यूप्रकरणी रोहित पवार यांचा आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीला होत असलेल्या विलंबामागे एक ‘मफलर मॅन’ कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. मफलरचा फोटो असलेली हार्ंडग्ज सर्वत्र झळकली होती. त्यामुळे हा ‘मफलर मॅन’ कोण याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. हा ‘मफलर मॅन’ म्हणजे दुसरेतिसरे कुणीही नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे आज स्पष्ट झाले. व्हीएसआर कंपनीच्या मालकासोबत फडणवीसांचा मफलरमधील फोटो झळकावत रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. या दुर्घटनेचा तपास सीआयडीकडून काढून घेऊन सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणीही त्यांनी केली.

अजित पवार यांचा अपघात होता की घातपात याबद्दल संशय अजूनही कायम आहे. सीआयडीकडून या दुर्घटनेचा तपास सुरू आहे. मात्र त्यात काहीच प्रगती दिसत नसल्याने रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तपासाला जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. कारण या दुर्घटनेला जबाबदार असणारे व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही.के. सिंग आणि रोहित सिंग यांची केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री व मुख्यमंत्री फडणवीस यांची घनिष्ठ मैत्री आहे असे सांगत रोहित पवार यांनी एक फोटो दाखवला. त्या फोटोमध्ये फडणवीस यांच्या गळ्यामध्ये मफलर दिसत होती. 21 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यात निवडणुकांचे निकाल असतानाही फडणवीस रोहित सिंग याच्या लग्नासाठी जयपूरला गेले होते. फडणवीस त्या वेळी उपमुख्यमंत्री होते, इतक्या महत्त्वाच्या पदावरची व्यक्ती निवडणुकीचे निकाल असतानाही लग्न सोहळ्याला राज्याबाहेर जाते यावरून संबंध किती जवळचे असावेत हे स्पष्ट होते, असे रोहित पवार म्हणाले.

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी थांबवल्यामुळेच अजितदादांना त्यांचा नियोजित कार प्रवास रद्द करून विमानाने जावे लागले होते, असे ते म्हणाले. अमेरिकेची संस्था आणि ‘डीजीसीए’च्या अहवालानुसार विमानात अनियमितता असल्याचे सिद्ध झाले आहे; तरीही सरकार आणि तपास यंत्रणांनी अद्याप ठोस कारवाई केलेली नाही, एफआयआरही नोंदवला गेला नाही, असे ते म्हणाले.

हिंमत असेल तर व्ही.के. सिंगला तुरुंगात टाका

रोहित सिंग आणि फडणवीस यांच्या फोटोमध्ये राघव नावाची व्यक्तीही आहे. तिचाही उल्लेख या वेळी रोहित पवार यांनी आवर्जून केला. राघव हा रोहित सिंगचा घनिष्ठ मित्र आहे, असे ते म्हणाले. फडणवीस यांच्यामध्ये हिंमत असेल तर व्ही.के. सिंगला तुरुंगात टाकावे आणि सीबीआयकडे तपास द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले.

Comments are closed.