Rohit Pawar criticized for not involving Eknath Shinde


आपत्ती व्यवस्थापनात नगरविकास खात्याचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. असे असतानाही राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश नसणे, ही बाब चकीत करणारी आहे.

(Disaster Management Authority) मुंबई : निर्विवाद बहुमताने महयुती सत्तेवर आली असली तरी, मंत्रिपदापासून खातेवाटपापर्यंत त्यांच्यात नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने दुखावलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीत आणखी भर पडली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (SDMA) पुनर्रचना करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सदस्यपद दिले आहे, पण एकनाथ शिंदे यांना मात्र डावलण्यात आले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीवर शरसंधान केले आहे.

महायुती सरकारने गुरुवारी नऊ सदस्यीय प्राधिकरणाची घोषणा केली. यामध्ये राज्याचे मुख्य सचिव हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. महायुती सरकारमध्ये भाजपापाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे. शिवसेनेकडे 57 आमदारांचे पाठबळ आहे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 41 आमदार आहेत. असे असतानाही राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात त्यांना स्थान न देण्यात आल्याने शिंदे गटातही नाराजी असल्याचे बोलले जाते. एकनाथ शिंदे हे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा अनुभव जास्त आहे. शिवाय, त्यांच्याकडे नागरी विकास आणि गृहनिर्माण खातेही आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याऐवजी त्यांची प्राधिकरणावर निवड व्हायला हवी होती, अशी भावना शिंदे गटाची आहे. तथापि, एका अर्थमंत्र्यांची या प्राधिकरणावर निवड करण्यात येत असते, ज्यामुळे एका उपमुख्यमंत्र्याचाच या प्राधिकरणात समावेश करण्यात आल्याचे बोलले जाते.

यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्वीट केले आहे. सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे तासाभराच्या पावसात तुडुंब भरणारी पुणे आणि मुंबईसारखी कोट्यवधी लोकसंख्या असणारी शहरे तसेच इतर शहरी भागांत आपत्तींची वाढलेली संख्या लक्षात घेता, आपत्ती व्यवस्थापनात नगरविकास खात्याचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. असे असतानाही राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश नसणे, ही बाब चकीत करणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात शिंदे यांचा समावेश मुद्दाम टाळला की इतर कारणांमुळे टाळला, हे अंदाज असूनही सांगता येणार नाही. परंतु आपत्ती व्यवस्थापनात नगर विकास खात्याचाच समावेश नसेल तर, आपत्ती व्यवस्थापनात त्रुटी राहण्याचा धोका उद्भवू शकतो. तरी राजकारण बाजूला ठेवून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात नगरविकास मंत्र्यांचा समावेश होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Manipur violence : भाजपाश्रेष्ठींना एवढीच संवेदनशीलता असती तर…, उद्धव ठाकरेंची जहरी टीका





Source link

Comments are closed.