मंत्र्यांनी शेतकऱ्यांवर काळाबाजार करत असल्याचा आरोप करून जखमेवर मीठ चोळू नये; रोहित पवारांचा भाजपवर घणाघात
राज्यात सध्या सुरू असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नसून केवळ काही लोक याचा काळाबाजार करत आहेत, असे विधान भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणे शक्य नसेल, तर किमान त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम तरी शासनाने बंद करावे, अशा शब्दांत रोहित पवार यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक व्हिडिओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील सटाणा येथील सुदा पेट्रोल पंपावरील परिस्थितीचा हवाला त्यांनी आपल्या पोस्टमध्ये दिला आहे. या पंपावर इंधनासाठी ताटकळत उभे असलेले त्रस्त शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक नेमके काय म्हणत आहेत, ते गिरीश महाजन यांनी लक्ष देऊन ऐकावे आणि त्यांची अडचण समजून घ्यावी, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
मा. गिरीश महाजन साहेब, डिझेलचा काळाबाजार करत असल्याचा ज्यांच्यावर आपण आरोप करत आहात ते सटाणा (ता. बागलान, जि. नाशिक) इथल्या सुदा पेट्रोल पंपावरचे त्रस्त शेतकरी आणि सामान्य माणसं काय म्हणतायेत ते लक्ष देऊन ऐका आणि त्यांचं म्हणणं समजून घ्या… त्यांना दिलासा देता येत नसेल तर… pic.twitter.com/lXkW4BWd8A
– रोहित पवार (@RRPSpeaks) 25 मे 2026
या संपूर्ण परिस्थितीला पेट्रोल पंप चालक किंवा सर्वसामान्य नागरिक जबाबदार नसून, शासकीय धोरणे आणि शासनच पूर्णपणे जबाबदार असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. पुढे बोलताना त्यांनी इंधनाचा काळाबाजार सर्वसामान्य जनता करत नसून, उलट मंत्रीच यात गुंतलेले असतात, असा गंभीर आरोपही केला आहे.
Comments are closed.