कर्जमाफीच्या अटी-शर्तींवरून रोहित पवारांचा सरकारवर निशाणा; ‘मंत्रिमंडळ नोट’चा दाखला देत केला फसवणुकीचा आरोप

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. कर्जमाफी योजनेमध्ये जाचक अटी आणि शर्ती समाविष्ट करून सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील एका अंतर्गत नोटचा दाखला देत रोहित पवारांनी सरकारचा ‘फसवा चेहरा’ जनतेसमोर आल्याचा दावा केला असून, या धोरणाविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत सरकारवर थेट हल्ला चढवला. मंत्रिमंडळ बैठकीच्या नोटमध्ये स्वतः सरकारनेच ‘अटी-शर्ती टाकल्याने कर्जमाफीसाठी कमीत कमी निधी लागेल’ असे नमूद केल्याचे त्यांनी उघड केले. हा प्रकार म्हणजे सरकार अत्यंत नियोजनबद्ध रीतीने शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे यातून स्पष्ट होते, असे पवार म्हणाले. शेतकऱ्यांप्रती जराही संवेदना नसलेल्या आणि असा अहवाल तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला, तसेच सरकारमध्ये असे अधिकारी असले तरी काही प्रामाणिक शेतकरीपुत्र अधिकारीही कार्यरत आहेत, ज्यांनी ही गोपनीय नोट बाहेर आणून सत्य समोर आणले, असे सांगत त्यांनी या नोट प्रसिद्ध करणाऱ्या अधिकाऱ्याचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले.

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना त्यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जेव्हा ही नोट मंजुरीसाठी मांडली गेली, तेव्हा एकाही मंत्र्याने या जाचक अटींवर आक्षेप घेतला नाही किंवा तोंड उघडले नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केले. सर्व मंत्री मूग गिळून गप्प बसले कारण कदाचित या योजनेतून कोणालाही टक्केवारीचा मालिदा मिळणार नव्हता, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. सरकारने आपली ही चूक त्वरित दुरुस्त करावी आणि कर्जमाफीच्या मार्गातील सर्व जाचक अटी व शर्ती तात्काळ काढून टाकाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांशी कोणत्याही परिस्थितीत दगाफटका खपवून घेतला जाणार नाही असेही रोहित पवार म्हणाले. सरकारच्या या फसव्या धोरणापासून अन्नदात्याचे रक्षण करण्यासाठी ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments are closed.