विठोबाच्या भूमीत दिलेला शब्द सरकारने फिरवला, कर्जमाफीच्या अटीमुळे 44 लाख शेतकऱ्यांची फसवणूक; रोहित पवार यांचा घणाघात
पंढरपूरच्या पवित्र भूमीत विठोबारायाच्या साक्षीनं मंत्र्यांनी दिलेला शब्द सरकारने पाळला नाही. शेतकरी कर्जमाफी आणि योजनांमध्ये जाचक अटी घालून 44 लाख शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. हा शेतकऱ्यांचा विश्वासघात असून या सरकारला याची 100 टक्के किंमत मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिला. सरकारच्या या भूमिकेचा निषेध म्हणून त्यांनी उद्यापासून 30 जूनपर्यंत विधिमंडळ अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याची घोषणाही केली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या फसव्या आश्वासनांवर सडकून टीका केली. काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथे मी आणि 26 शेतकऱ्यांनी मिळून कर्जमाफीच्या अटी रद्द करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन केले. तब्बल 65 ते 70 तासांच्या आंदोलनानंतर सरकारचे मंत्री गिरीश महाजन तिथे पोहोचले होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा घडवून आणली आणि अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 22 तारखेच्या आधी बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले होते. राजकारण न करता शेतकऱ्यांचे ऐकून घेऊ, असा शब्द त्यांनी दिला होता, मात्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा थेट आरोप रोहित पवार यांनी केला.
सरकारच्या योजनांवर टीका करताना रोहित पवार म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने योजना सुरू केली खरी, पण त्यात इतक्या अटी टाकल्यात की 44 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. महामानवांचे नाव देऊन अशा जाचक अटी लादणे हा अहिल्यादेवींच्या नावाचा अवमान आहे. लोकांनी आम्हाला सरकारवर विश्वास ठेवायला सांगितला, आम्ही ठेवला, पण आमचा विश्वासघात झाला, असे रोहित पवार यावेळी म्हणाले.
अधिवेशनावर बहिष्कार, 29 ला संभाजीनगरमध्ये ‘रास्ता रोको’
रोहित पवार यांनी सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने मी फक्त सही करण्यासाठी आलो आहे. उद्यापासून 30 जूनपर्यंत मी अधिवेशनात येणार नाही. या काळात मी मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहे. तसेच, येत्या 29 तारखेला (सोमवारी) छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठे ‘रास्ता रोको’ आंदोलन उभारणार आहोत. या विश्वासघाती सरकारला आम्ही सोडणार नाही.30 तारखेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही या अटी काढा आणि शेतकऱ्यांवर जो अन्याय होतोय तो थांबवा. असाचं शेतकऱ्यांचा अपमान आणि अन्याय करत राहाल तर हे तुम्हाला मागात पडेल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
शेतकऱ्यांचे पैसे वाचवून कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा डाव
कर्जमाफी योजनेत 23 हजार लाभार्थी असताना, जाचक अटींमुळे केवळ 6 हजार शेतकऱ्यांनाच लाभ मिळत आहे. उर्वरित शेतकरी वंचित राहत आहेत. ही कर्जमाफी पूर्णपणे फसवी आणि सरकारचा दिखावूपणा आहे. सरकारला पैसे वाचवायचे आहेत आणि ते वाचलेले पैसे कंत्राटदारांच्या घशात घालून कमिशन खायचे, हे सत्ताधाऱ्यांचे ठरले आहे, असा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केला.
Comments are closed.