रामराजे निंबाळकरांना त्रास देण्याचा प्रयत्न, पण सत्ता ही सदासर्वकाळ…; रोहित पवारांचा जयकुमार
जयकुमार गोरे वि रामराजे नाईक निम्बालकरवरील रोहित पवार: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या बदनामी व खंडणी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वडूज पोलिस माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे यांचे मोबाईलवर संभाषण झाल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर वडूज पोलिसांनी रामराजे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. संबंधित महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आता या चौकशीचा भाग म्हणून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू झाली आहे. वडूज पोलिसांनी या प्रकरणात एकूण 11 जणांना समन्स बजावले आहेत. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हल्लाबोल केलाय.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, सत्तेचा आणि पदाचा गैरवापर कसा असतो, हे मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात दिसत आहे. पदाचा गैरवापर करत न्याय मागणाऱ्या पिडीतेलाच जेलमध्ये टाकून आणि सत्य उजेडात आणणारे निर्भिड व खरे पत्रकार तुषार खरात यांना खोट्या गुन्ह्यात अडकवूनही या मंत्र्यांचं समाधान झाल्याचं दिसत नाही. म्हणूनच विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर साहेब यांना चौकशीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. पण सत्ता ही सदासर्वकाळ नसते. आजची सत्ता उद्या जाईल, त्यावेळी आपली काय अवस्था होईल? हे आज सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी विसरू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
सत्तेचा आणि पदाचा गैरवापर कसा असतो हे मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात दिसत आहे. पदाचा गैरवापर करत न्याय मागणाऱ्या पिडीतेलाच जेलमध्ये टाकून आणि सत्य उजेडात आणणारे निर्भिड व खरे पत्रकार तुषार खरात यांना खोट्या गुन्ह्यात अडकवूनही या मंत्र्यांचं समाधान झाल्याचं दिसत नाही. म्हणूनच…
– रोहित पवार (@rrpspeaks) 16 मे, 2025
नेमकं प्रकरण काय?
कराड तालुक्यातील एका महिलेला अश्लील फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. संबंधित महिलेने गोरेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप करत सांगितले होते की, मागील सहा वर्षांपासून त्यांचे कार्यकर्ते तिला सातत्याने त्रास देत होते. महिलेने याबाबत तक्रार करत जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर थांबून आपली व्यथा मांडली होती, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही घटनेची माहिती दिली होती. मात्र, पोलीस अधीक्षकांनी याकडे कोणतीही दखल घेतली नाही, असेही तिने सांगितले होते. या आरोपांनंतर विरोधकांनी जयकुमार गोरे यांच्यावर कडाडून टीका केली. मात्र, पुढे या प्रकरणातील संबंधित महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना अटक करण्यात आली. तसेच ‘लय भारी’ या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांनाही अटक झाली. गोरे यांच्याविरोधात एकतर्फी बातम्या प्रसारित करून बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे संबंधित महिलेच्या संपर्कात असल्याचे मोबाईल संवादावरून समोर आले होते. या पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर यांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.