मी वर्तवलेली शक्यता खरी होताना दिसत आहे! अजितदादांच्या विमान अपघाता संदर्भात रोहित पवारांचा मोठे विधान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून सत्ताधाऱ्यांवर आणि तपास यंत्रणांवर गंभीर निशाणा साधला आहे. “मी वर्तवलेली शक्यता आता खरी होताना दिसत आहे,” असे म्हणत त्यांनी या प्रकरणातील ‘ब्लॅक बॉक्स’ खराब झाल्याच्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या ‘X’ (ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी तपासातील विलंब आणि संबंधित कंपनीच्या भूमिकेवर थेट भाष्य केले आहे. ते म्हणाले आहेत की, “अजितदादांची किंमत सर्वसामान्य नागरिकांना समजली पण अजून तपास यंत्रणांना मात्र समजलेली दिसत नाही. दुर्दैवी अपघातानंतर २० दिवस झाले पण अजूनही तपासाला वेग आला नाही. केवळ VSR कंपनीला पुरावे नष्ट करता यावे म्हणून तर उशीर होत नाही ना? की कंपनीला कुणाचा वरदहस्त आहे, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.”

रोहित पवार म्हणाले आहेत की, “आज ब्लॅक बॉक्स खराब झाल्याबाबत जी काही माहिती समोर येत आहे, त्यावरून मी ५ दिवसांपूर्वी वर्तवलेली शक्यता खरी होताना दिसत आहे. असो, आम्ही मात्र दादांचा अपघात की घात याचे उत्तर मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.” याच मुद्द्यावर ते दोन दिवसात पत्रकार परिषद घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.