Tamil Nadu Politics राज्यपालांना भाजपच्या एकमेव आमदाराला मुख्यमंत्री करायचे असेल, रोहित पवार यांचा टोला
तमिळनाडूमध्ये सर्वाधिक जागा जिंकून मोठा पक्ष ठरलेल्या TVK चे प्रमुख विजय 112 आमदारांच्या समर्थनाचे पत्र घेऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घ्यायला गेले होते. त्यावेळी राज्यपालांनी विजय यांना 118 आमदारांचे पत्र घेऊन या असे सांगून परत पाठवले. त्यामुळे तमिळनाडूतील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल व भाजपवर टीका केली आहे. कर्नाटकमध्ये 2018 च्या निवडणूकीत तत्कालिन राज्यपालांनी सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्याचे उदाहरण देते रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
”तमिळनाडूमध्ये काँग्रेसच्या पाठींब्याने सरकार स्थापन करण्याची तयारी TVK ने दाखवूनही राज्यपालांकडून त्यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं जात नाही… कर्नाटकमध्ये २०१८ मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी बहुमत नसतानाही कर्नाटकचे तत्कालीन राज्यपाल विजुभाई वाला यांनी सर्वाधिक जागा असलेल्या भाजपाला सरकार स्थापनेचं निमंत्रण देऊन येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचीही शपथ दिली होती, पण तिथं भाजपचा मुख्यमंत्री बसवायचा म्हणून सर्वाधिक जागा असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. पण आज तमिळनाडूच्या जनतेने भाजपाला साफ नाकारून सर्वांत मोठा पक्ष म्हणून TVK ला सर्वाधिक जागा दिल्या असूनही ‘तमिळनाडूचे कोश्यारी’ हे TVK चे नेते विजय यांना अजूनही सरकार स्थापनेचं निमंत्रण देत नाहीत.. कदाचित त्यांना तमिळनाडूमध्येही महाराष्ट्र, दिल्ली, गोवा राज्यातील पॅटर्न राबवून भाजपाच्या एकमेव आमदाराला मुख्यमंत्रीपदी नेमायचं की काय, अशीच शंका येते”, अशी पोस्ट रोहित पवार यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.
Comments are closed.