अशोक खरात याने अजितदादांच्या फोटोवर फुल्ल्या मारलेल्या, रोहित पवार यांचा आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्युचा अशोक खरात याच्याशी देखील संबंध असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अनेकदा केला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी या प्रकरणी अशोक खरात याने जादूटोणा करण्यासाठी अजित दादांच्या फोटोवर फुल्ल्या मारल्याचा दावा केला आहे. रोहित पवार यांनी याबाबत ट्विट केले आहे. अजित पवारांसोबतच महाराष्ट्रातील आणखी एका बड्या नेत्याच्या फोटोवर अशोक खरातने फुल्ल्या मारलेल्या होता असा दावाही या पोस्टमधून करण्यात आला आहे.

”जादूटोणासारख्या अंधश्रद्धांना महाराष्ट्र कधीही भीक घालत नाही परंतु जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू दुर्लक्षून चालणार नाही. भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्ल्या मारण्यात आल्याचं समजतंय. या भोंदू खरातने कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला? ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता? हेही समोर येणं गरजेचं आहे”, असे रोहित पवार म्हणाले.

तसेच असे जादूटोणा करणाऱ्या अंधभक्तांचे चेहरे देखील समोर यायला हवे असेही ते म्हणाले आहेत. ”डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या महाराष्ट्रात कर्तृत्वापेक्षा आणि जनतेच्या कामांपेक्षा असल्या भोंदूगिरीवर विश्वास ठेवला जात असेल तर पुढच्या पिढीला काय संदेश जाणार आहे? हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच महाराष्ट्राच्या भविष्यालाही घातक आहे. त्यामुळं या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा करणाऱ्या अंधभक्तांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत”, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.

Comments are closed.