खुन्यांना वाचवून न्यायाचा मुडदा पाडू नका, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरून रोहित पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीमुळे प्राण गमावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी मंगळवारी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचा एक व्हिडीओ शेअर केला. यात त्या हे सरकार गरीबांचे मायबाप नाही तर गुन्हेगारांचे आणि पैशावाल्यांचे मायबाप असल्याचे म्हणताना दिसतात. हाच धागा पकडत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री महोदय, खुन्यांना वाचवून न्यायाचा मुदडा पाडू नको, असे रोहित पवार यांनी म्हटले.
पूर्वी म्हणायचे सरकार गरीबांचे मायबाप असतात, पण हे सरकार पैशावाल्याचे, गुन्हेगाराचे मायबाप आहे. ते माझ्या गरीबाचे मायबाप नाही. आज आठ महिने झाले, पण मी न्यायाची वाट पाहत आहे, असे म्हणत सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजया सूर्यवंशी टाहो फोडतात. हाच व्हिडीओ रोहित पवार यांनी आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केला आहे.
‘हे सरकार गरीबांचं मायबाप नाही तर गुन्हेगारांचं आणि पैसेवाल्यांचं मायबाप आहे, हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रींचे उद्विग्न शब्द काळीज चिरणारे आणि आजच्या सत्ताधाऱ्यांचं वस्त्रहरण करणारे आहेत. पोटच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी एक आई 8 महिन्यांपासून टाहो फोडतेय, आधी हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टानेही दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला पण सरकार मात्र अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री महोदय, कृपया खुन्यांना वाचवून न्यायाचा मुडदा पाडू नका’, असे ट्विट रोहित पवार यांनी केले.
हे सरकार गरीबांचं मायबाप नाही तर गुन्हेगारांचं आणि पैसेवाल्यांचं मायबाप आहे, हे स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रींचे उद्विग्न शब्द काळीज चिरणारे आणि आजच्या सत्ताधाऱ्यांचं वस्त्रहरण करणारे आहेत. पोटच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी एक आई ८ महिन्यांपासून टाहो फोडतेय, आधी हायकोर्ट… pic.twitter.com/0oje256rau
– रोहित पवार (@rrpspeaks) 12 ऑगस्ट, 2025
प्रकरण काय?
परभणी येथे 10 डिसेंबर 2024 रोजी संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेवरून दंगल उसळली होती. दंगलखोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी घराघरात घुसून निष्पापांना अटक केली होती. यात कायद्याचे विद्यार्थी असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता, न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मारहाणीतच सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. मात्र पोलिसांनी या मारहाणीबद्दल मिठाची गुळणी धरली. अखेर शवविच्छेदन अहवालाने पोलिसी क्रौर्य जगासमोर आणले.
Comments are closed.