“कर्तृत्वावर एवढा विश्वास होता तर गुंडगिरी करून…”, रोहित पवारांची गिरीश महाजन यांच्यावर टीका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होण्याआधीच भाजपने दंडेलशाहीच्या जोरावर बिनविरोध नगरसेवक, नगराध्यक्ष निवडून आणण्याचा नवीन फॉर्म्यूला केला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनगर नगरपरिषदेमध्येही हाच फॉर्म्यूला वापरण्यात आला. तिथे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्ष झाल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका उमेदवाराची भाजप कार्यकर्त्यांनी कॉलर पकडली होती. यावरून आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली होती. ही टीका जिव्हारी लागल्याने महाजन यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

आजोबांच्या मांडीवर, कडेवर बसून पहिल्यांदा आमदार झाले होते. दुसर्‍यांदा काकांनी (अजित पवार) दुर्लक्ष केल्याने त्यांचा पोस्टल मतांवर जेमतेम विजय झाला. आणि आता ते आम्हाला अक्कल शिकवायला निघाले आहेत, अशी टीका केली होती. या टीकेला आता रोहित पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार यांनी मंगळवारी एक्स अकाऊंटवरून पोस्ट करत गिरीश महाजन यांचा समाचार घेतला.

गिरीश महाजन साहेब, आपल्याला आपल्या कर्तृत्वावर एवढा विश्वास होता तर गुंडगिरी करून समोरच्या उमेदवारांना पकडून आणून बळजबरीने अर्ज मागे का घ्यायला लावले? विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक लढवण्याची हिम्मत का दाखवली नाही? एवढं मोठं मंत्रिपद असूनही आपण उत्तर महाराष्ट्र तर सोडा जळगावसाठी काय केलं, एकतरी उद्योग आणला का? जळगाव आपलं घर असताना आपलं सगळं चित्त फक्त नाशिककडंच का? असा सवाल रोहित पवार यांनी केला.

उमेदवार निवडीचा नवा फॉर्म्युला! निवडणुकीच्या आधीच भाजपचे 100 नगरसेवक बिनविरोध विजयी

आपल्या कार्यकाळात भकास असलेला विकास गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण मोटारसायकलवरून जात असतानाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने बघितलाच आहे. आता मंत्रिपद आहे तर किमान आपल्या भागाला, आपल्या जिल्ह्याला तरी फायदा करून द्या… तूर्तास एवढंच! असेही रोहित पवार म्हणाले.

Comments are closed.