स्वार्थ साधला गेला की भाजप आपले खरे रंग दाखवायला सुरुवात करते, मित्र पक्षांकडून शिक्कामोर्तब! रोहित पवारांची पोस्ट

सोमवार, १३ डिसेंबर रोजी महानगर पालिकांच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. त्यानंतर राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावेळी राज्यातील सत्ताधारी महायुतीला तडे गेल्याचे पाहायला मिळाले. त्यासोबत आरोप प्रत्यारोपांची सुरुवात झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड येथे भाजप शिंदे गट एकत्र लढणार असून अजित पवार गट स्वतंत्र लढणार आहे. याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार लिहितात की, ‘अलीकडेच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये महायुतीतील नेत्यांनीच भाजपबद्दल केलेली वक्तव्य बघितल्यानंतर आपला स्वार्थ साधला गेला की भाजप आपले खरे रंग दाखवायला सुरवात करते यावर त्यांच्याच मित्र पक्षांनी शिक्कामोर्तब केलं. काल निवडणुका जाहीर झाल्या झाल्या आम्ही पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये महायुती मध्ये लढणार नसल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली’.
पुढे रोहित पवार यांनी भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा नाही असा सवाल देखील उपस्थित केला आहे. ते म्हणतात, ‘आधी कुबड्या म्हणून हिणवले आणि आता भाजपने अलगदपणे आपल्याच एका मित्रपक्षाला वेगळे पाडले ही राक्षसी महत्त्वाकांक्षा नाही तर काय आहे?’
‘याच राक्षसी महत्त्वाकांक्षी वृत्तीमुळे २०२९ मध्ये भाजप विरुद्ध सर्व पक्ष हे चित्र दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही’, असा भाकित देखील रोहित पवार यांनी वर्तवले आहे.

Comments are closed.