CID सारख्या कुचकामी यंत्रणा म्हणजे बिनकामाचे ओझेच, रोहित पवार यांचा संताप
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्युला उद्या चार महिने होणार आहेत. अद्याप या प्रकरणात सीआयडीकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून सीआयडीवर जोरदार टीका केली आहे. ”सीआयडी सारख्या कुचकामी यंत्रणा म्हणजे बिनकामाचे ओझेच” अशा शब्दात त्यांनी सीआयडीवर ताशेरे ओढले.
रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी मुख्यमंत्र्यांनी गेल्या अडीच महिन्यात अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी काय कारवाई केली ते सांगावे असे म्हटले आहे. ”अजितदादांच्या अपघाताला उद्या 4 महिने होतील. अधिवेशनात बोलताना तुम्ही गुन्हेगारांना पाताळातून शोधून काढण्याचा, CBI चौकशीबाबत अमित शहा साहेबांकडे पाठपुरावा करण्याचा तसंच कर्नाटकात नोंद झालेली झिरो FIR महाराष्ट्रात वर्ग करून घेण्याचा शब्द दिला होता. आपण शब्द देऊन अडीच महिने होत आले, या अडीच महिन्यात काय कार्यवाही झाली हे आपणच सांगावे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांसोबत गेल्या अडीच महिन्यात आपल्या असंख्य बैठका झाल्या असतील त्यामध्ये सीबीआय चौकशीचा मुद्दा आपण घेतला नसेल तर आज होणाऱ्या बैठकीत तरी हा मुद्दा आग्रहाने घ्यायला हवा. राष्ट्रवादीचे मंत्री उपस्थित असतील तर त्यांनी देखील पाठपुरावा करायला हवा. मित्र हयात असला किंवा नसला तरी मित्रासाठी मैत्री नेहमीच जिवंत असते, ही सर्वसामान्य जनतेची भावना असते, राजकीय लोकांसाठी ही भावना वेगळी आहे का ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही”, असे रोहित पवार म्हणाले.
या पोस्टमधून त्यांनी सीआयडीवर देखीाल निशाणा साधला. ”CID काय करते नेमकं हेच कळत नाही. गेल्या 28 तारखेला CID कार्यालयात गेलो असता तपास अधिकारीच उपस्थित नव्हते, त्यांना mail करून अनेक नवे पुरावे दिले, पत्र स्वतः जाऊन दिले तरी त्यांचा काहीही प्रतिसाद नाही. अजितदादांच्या अपघात प्रकरणात सीआयडी करत असलेला तपास बघता, CID सारख्या कुचकामी यंत्रणा म्हणजे बिनकामाचे ओझेच म्हणावे लागेल. असो, उद्या सीआयडी ऑफिसची वेळ मागितली असून उद्या सकाळी 10.30 वाजता भेट देणार आहे. CID ऑफिसला कदाचित सनदशीर मार्गाची भाषा समजत नसेल तर वेगळ्या भाषेत सांगावे लागेल”, असा इशाराही त्यांनी या पोस्टमधून दिला आहे.
Comments are closed.