संघात निवडलं, पण बीसीसीआयने रोहित अन् विराटला दिला अल्टिमेटम, 2027 चा वनडे विश्वचषक खेळायचा असे


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी नुकताच टीम इंडियाचा संघ जाहीर (India Squad Announcement For Australia Tour) करण्यात आला. या संघात मोठा बदल करत बीसीसीआयने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत शुभमन गिलला नवीन कर्णधार म्हणून नेमलं आहे.

त्यानंतर बीसीसीआयने आणखी एक मोठा निर्णय घेतला असून विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दिग्गज खेळाडूंना आता देशांतर्गत स्पर्धा खेळणं बंधनकारक केलं आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी 5 ऑक्टोबर 2025 रोजी स्पष्ट संकेत दिले की, जेव्हा हे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी उपलब्ध नसतील, तेव्हा त्यांना विजय हजारे ट्रॉफीसारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळावं लागेल.

संघात निवडलं, पण बीसीसीआयने रोहित आणि विराटला दिला अल्टिमेटम

अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, आता खेळाडूंची निवड केवळ त्यांच्या कामगिरीच्या आधारावरच होणार आहे. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की कोहली आणि रोहितला निवडीसाठी विजय हजारे ट्रॉफी खेळणं आवश्यक आहे का, तेव्हा त्यांनी ठामपणे उत्तर दिलं की, “मला वाटतं की आम्ही एक किंवा काही वर्षांपूर्वी हे स्पष्ट केलं होतं की जेव्हा जेव्हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते नसले, तेव्हा त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळावं.”

हा निर्णय बीसीसीआयने यंदाच्या जानेवारी महिन्यात घेतलेल्या आदेशाशी सुसंगत आहे, ज्यामध्ये सर्व उपलब्ध खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होणं अनिवार्य करण्यात आलं होतं. गेल्या दशकभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यस्त असलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा आता या नियमाला अपवाद राहणार नाहीत.

कर्णधार बदलला, आणि नियम झाले कडक

36 वर्षांचा विराट कोहली आणि 38 वर्षांचा रोहित शर्मा सध्या केवळ वनडे फॉरमॅटमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी टेस्ट आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत हे दोघे पुन्हा मैदानात उतरणार आहेत, आणि चाहत्यांमध्ये त्याबद्दल मोठी उत्सुकता आहे.

आगरकर यांनी स्पष्ट केलं की, 2027 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या दृष्टीने हे बदल आवश्यक आहेत. रोहित शर्मा यांच्याकडून अलीकडेच वनडे कर्णधारपद काढून घेत शुभमन गिलला जबाबदारी देण्यात आली आहे. बीसीसीआयचं मत आहे की खेळाडू कितीही मोठे असले तरी त्यांनी देशांतर्गत क्रिकेटद्वारे आपली फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करायला हवी. हा निर्णय भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी घेतलेलं एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

हे ही वाचा –

Ind vs Pak सामन्यानंतर पॉइंट्स टेबलचा चेहरामोहराच बदलला! सलग दोन पराभवानंतर पाकिस्तान तोंडावर आपटला, तर टीम इंडियाचा जलवा सुरूच

आणखी वाचा

Comments are closed.