मैदानावर उतरताच इतिहास रचणार रोहित शर्मा; खास क्लबमध्ये मिळणार मानाचे स्थान
भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या मैदानापासून दूर आहे. पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये तो दिसणार नाही, कारण ही स्पर्धा टी20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे, रोहित शर्मा यापूर्वीच या फॉरमॅटमधून निवृत्त झाला आहे. सध्या तो फक्त वनडे खेळत आहे.
आता रोहित शर्मा पुढच्या सामन्यात मैदानात उतरला की एका खास क्लबमध्ये सामील होणार आहे. या क्लबमध्ये आतापर्यंत फक्त चारच भारतीय खेळाडू आहेत आणि रोहित पाचवा ठरणार आहे.
सचिन तेंडुलकर सर्वाधिक सामने खेळलेला भारतीय
भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. 1989 मध्ये पदार्पण केलेल्या सचिनने 2013 पर्यंत खेळताना एकूण 664 सामने खेळले. यात कसोटी, वनडे आणि टी20 या तिन्ही प्रकारांचा समावेश आहे. इतके सामने खेळणारा दुसरा कुठलाही भारतीय खेळाडू नाही.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे विराट कोहली, ज्याने 2008 पासून आतापर्यंत 550 सामने खेळले आहेत. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 535 सामने खेळले असून तो तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या क्रमांकावर आहे राहुल द्रविड, ज्याने आपल्या कारकिर्दीत 504 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
यादीतील पुढचा खेळाडू म्हणजे रोहित शर्मा. 2007 मध्ये पदार्पण केलेल्या रोहितने आतापर्यंत 499 सामने खेळले आहेत. म्हणजेच 500 सामन्यांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त एका सामन्याची गरज आहे.
भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या मालिकेत तीन वनडे सामने होणार आहेत. या पहिल्याच सामन्यात रोहित मैदानात उतरला तर तो भारताकडून 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पाचवा खेळाडू ठरणार आहे. त्यामुळे हा सामना रोहितच्या कारकिर्दीसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
Comments are closed.