रोहित शर्मा ‘सिक्सर किंग’, शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाला मागे टाकले
हिंदुस्थानचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा हा वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 352 षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम करत ‘षटकार किंग’ ठरला. त्याने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या 351 षटकारांच्या विक्रमाला मागे टाकले. या फॉरमॅटमध्ये 300 हून अधिक षटकार मारणारा तिसरा खेळाडू वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल (331) होय.
सर्व फॉरमॅटमध्ये मिळून रोहितचेच सर्वाधिक षटकार
याचबरोबर एकूण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने आतापर्यंत 645 षटकार फटकावले आहेत. याबाबतीत दुसऱया क्रमांकावरील ख्रिस गेल (553 षटकार) रोहितच्या खूप मागे आहे. टी-20 क्रिकेटमध्येही रोहितच्याच नावावर सर्वाधिक षटकार जमा आहेत.
कर्णधार म्हणून दुसरा 'सिक्सर राजा'
कर्णधार म्हणूनही रोहितची धमाकेबाज कामगिरी कायम आहे. वन डे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून त्याने 126 षटकार ठोकले आहेत. हा संयुक्तरीत्या दुसऱया क्रमांकाचा विक्रम असून एम. एस. धोनीनेही तेवढेच षटकार मारले आहेत. या यादीत सर्वाधिक 147 षटकारांसह इंग्लंडचा इऑन मॉर्गन अव्वल आहे. ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (123) आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स (118) यांचाही या यादीत समावेश होतो.
एका देशाविरुद्धही रोहितचेच सर्वाधिक षटकार
ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितचे 93 षटकार हा एखाद्या खेळाडूचा एका विशिष्ट प्रतिस्पर्ध्याविरुद्धचा सर्वोच्च आकडा आहे. त्यापुढे ख्रिस गेलचा इंग्लंडविरुद्ध 85 षटकारांचा विक्रम येतो. वन डे क्रिकेटमध्ये एकापेक्षा अधिक संघांविरुद्ध 50 हून अधिक षटकार ठोकणाऱया खेळाडूंमध्ये शाहिद आफ्रिदी (श्रीलंका 63, हिंदुस्थान 51, न्यूझीलंड 50) आणि रोहित (श्रीलंका 58) यांचा समावेश होतो.
रोहित मायदेशातील षटकारांचा दादा
हिंदुस्थानमध्ये खेळताना रोहितचे 182 षटकार हे एखाद्या खेळाडूचे एका देशातील सर्वाधिक षटकार आहेत. या यादीत ख्रिस गेल (147), मार्टिन गप्टिल (132), ब्रेण्डन मॅकलम (126), एम. एस. धोनी (123) आणि इऑन मॉर्गन (116) यांचा समावेश आहे.
Comments are closed.